स्वाइन फ्ल्यूने दगावलेल्या रुग्णांमध्ये अतिजोखमीच्या रुग्णांचे प्रमाण ६० टक्के - आरोग्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 August 2017

स्वाइन फ्ल्यूने दगावलेल्या रुग्णांमध्ये अतिजोखमीच्या रुग्णांचे प्रमाण ६० टक्के - आरोग्यमंत्री


मुंबई, दि १८ - स्वाइन फ्ल्यूमुळे आतापर्यंत राज्यभरात ४१८ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील जवळपास ६० टक्के रुग्ण हे अतिजोखमीच्या (हृदयविकार, अतिउच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग) आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे हे सर्व मृत्यू केवळ स्वाइन फ्ल्यूमुळे झाले असे म्हणता येणार नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले. 

आरोग्यमंत्री म्हणाले की, स्वाइन फ्ल्यू प्रतिबंधक व उपचारासाठी राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने यापूर्वीच आवश्यक ती पावले उचलली आहेत. राज्यात २१९९ ठिकाणी स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे स्क्रिनिंग करणारे सेंटर्स सुरू करण्यात आले असून आतापर्यंत १३ लाख ६२ हजार रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे.

स्वाइन फ्ल्यूवरील ऑसेलटॅमिवीर औषध आणि इतर साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत लसीकरण सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील गरोदर मातांबरोबरच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना देखील ही लस देण्यात येत आहे. १६ ऑगस्ट २०१७ अखेर ३२ हजार ४१६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

‘स्वाइन फ्ल्यू मुळे सर्वाधिक म्हणजे ४० मृत्यू हे नाशिक मनपा क्षेत्रात झाले आहेत. त्याखालोखाल पुणे मनपा आणि पुणे ग्रामीणमध्ये अनुक्रमे ३६ आणि ३१ रुग्ण दगावले आहेत. मराठवाडा आणि विदर्भात स्वाइन फ्ल्यूचे प्रमाण कमी आहे. या भागातील बीड, धुळे, वाशीम, जळगाव, जालना या जिल्ह्यात प्रत्येकी २ तर हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, भंडारा, या जिल्ह्यात प्रत्येकी १ रुग्ण स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू पावल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात झालेल्या ४१८ मृत्यूंमध्ये जवळपास ६० टक्के रुग्ण हृदयविकार, अतिउच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग या अतिजोखमीच्या आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे सर्व मृत्यू केवळ स्वाईन फ्लुमुळे झाले असे म्हणता येणार नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नुकत्याच झालेल्या अधिवेशनादरम्यान स्वाइन फ्ल्यूचा आढावा घेणारी बैठक आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. त्यावेळी स्वाईन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूची निश्चिती करण्यासाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात ‘डेथ ऑडीट कमिटी’ स्थापन करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामाध्यमातून मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेणे शक्य होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते.

राज्यभरात स्वाइन फ्ल्यू सदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत असून सर्व रुग्णांवर विनाविलंब उपचार करण्यात येत आहेत. फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी उपचार सुविधा असणाऱ्या खासगी रुग्णालयांना देखील स्वाइन फ्ल्यू उपचाराची मान्यता देण्यात आली आहे. स्वाइन फ्ल्यूला आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य विभागामार्फत योग्य ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. अति जोखमीच्या गटातील रुग्णांनी तसेच ज्येष्ठ नागरीक, लहान मुले, गरोदर स्त्रिया यांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS