मुंबई / प्रतिनिधी - मुंबई बँकेत खाते उघडले नसल्याने जुलै महिन्याचा पगार वितरित न झालेल्या शिक्षकांसंदर्भांत शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. तसेच मुंबई बँकेचे प्रतिज्ञापत्रही न्यायालयाने दाखल करून घेतले आहे. त्यानुसार जुलैचा पगार न मिळालेल्या शिक्षकांबाबत आता शुक्रवारी (दि. ११) पुढील सुनावणी होणार आहे.
मुंबई बँकेकडे केवायसी कागदपत्रासह 15000 शिक्षकांनी खाती उघडली आहेत. आतापर्यंत केवायसी पूर्तता करणाऱ्या आणि पगार बिले मिळालेल्या 10,777 शिक्षकांच्या वेतनापोटी बँकेने ५३ कोटी रुपये वितरित केले आहेत. तर 11 कोटींचे कर्जही वितरित केले आहे. शाळांकडून जशी पगारपत्रके जमा होतील त्यानुसार पगार वितरित करण्यात येत आहे. मुंबईतील सर्व शिक्षकांना वेळेत पगार वितरित करण्यास बँक सक्षम असल्याची माहिती मुंबई बँकेने आपल्या प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालायाला सादर केली.
त्यानंतर, मुंबई बँकेत खाते न उघडल्याने जुलै महिन्याचा पगार न मिळालेल्या शिक्षकांबाबत शिक्षक संघटनेची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. शिक्षकनाचे वेतन हा राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्याने यासंदर्भात शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, यावर आता शुक्रवारी सुनावणी होईल, अशी माहिती ऍड अखिलेश चौबे यांनी दिली.