पालिकेतील सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर -
मुंबई / प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेतील माध्यमिक शिक्षकांच्या अनेक प्रश्नांबाबत प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने त्याच्या आडमुठ्या धोरणाला कंटाळून माध्यमिक शिक्षकांनी महापौर पुरस्कारांच्या प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेत शिवसेना सत्तेवर असताना शिवसेनेशी संलग्न असलेल्या शिक्षक संघटनेनेच महापौर पुरस्कारावर बहिष्कार टाकून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे. याबाबतचा निर्णय़ शिक्षकांच्या झालेल्या सभेत सहमतीने घेतला आहे. दरम्यान, याबाबतचे पत्र महापौर विश्वनाथ महाडेश्वर याना दिले असून त्याच्या प्रति राज्यपाल , मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, आयुक्त, अति आयुक्त, उपायुक्त, शिक्षणाधिकारी सर्व समिती अध्यक्ष तसेच सर्वपक्षीय गटनेते यांना पाठवण्यात आल्याचे माध्यमिक शिक्षक सेनेचे सरचिटणीस गोविंद ढवळे यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या विविध माध्यमाच्या एकूण अनुदानित ४९ माध्यमिक शाळा असून १५० पेक्षा जास्त विनाअनुदानित शाळा आहेत. या शाळांमध्ये साधारणपणे २००० शिक्षक कार्यरत आहेत. पालिका अधिनियम १८८८ व शासन निर्णयानुसार पालिका माध्यमिक शिक्षक हे पालिका कर्मचारी आहेत मात्र पालिका प्रशासन हे मान्य करण्यास तयार नाही, त्यामुळे या शिक्षकाना वेतन सोडून इतर आर्थिक लाभ मिळत नाहीत. सन १९८८ ते २००० पर्यंत बोनस. एल. टी. ए. पाल्य शिष्यवृत्ती गृहकर्ज व्याज सवलत हेफायदे पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे दिले गेले. परंतु अधिकारी बदलले गेल्यानंतर हे सर्व फायदे बंद करण्यात आले. खाजगी माध्यमिक शिक्षकांना शासनाकडून अनेक मोठ्या शस्त्रक्रियांसाठी मोठी मदत दिली जाते, मात्र पालिका प्रशासन मेडिकेम पॉलिसी स्वतः देत नाही आणि शासनाकडूनही लाभ मिळू देत नाही अशा प्रकारे शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप कर्मचारी सेनेने केला आहे. पालिकेचे फायदे मिळण्यासाठी मागणी केल्यास तुम्ही पालिकेचे कर्मचारी नाहीत असे सांगून प्रशासनाकडून फायदे नाकारले जातात. तर शासनाकडून फायदे मिळत असल्यास त्यावेळी पालिका कायद्याचा वापर करून ते नाकारले जातात, पालिका प्रशासनाच्या या आडमुठे धोरणाला माध्यमिक शिक्षक कंटाळले आहेत, संघटनेमार्फत अर्ज विनंत्या करूनही त्याची दखल घेतली जात नाही . त्यामुळे माध्यमिक शिक्षकांनी महापौर पुरस्कार प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय़ घेतल्याचे ढवळे यांनी सांगितले .