पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीपासून शिवसेना आणि भाजपा या दोन राजकीय पक्षात सुरु झालेला सामना पालिका सभागृहापासून आता थेट वॉर्डपर्यंत पोहचला आहे. गोराईयेथील शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेविकांमध्ये वाद निर्माण होऊन परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. बोरिवली पोलिसांनी मारहाण, धमकावणे आणि विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गोराईमधील भाजपा नगरसेविका अंजली खेडेकर या काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला बगीच्याची पाहणी करायला गेल्या. त्यावेळी त्यांना तिथे जिमचं बांधकाम सुरू असल्याचं दिसलं. त्यावेळी त्यांनी विचारपूस केली असता त्यांना स्थानिक शिवसेना नगरसेविका संध्या दोशी यांचे पती विपुल दोशी यांच्या मालकीचं ते जिम असल्याचं कळलं. त्याचप्रमाणे या जिममधे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या कचऱ्याच्या मोठ्या पेट्या ठेवल्याचं त्यांना आढळलं. त्यावेळी त्यांनी स्थानिक वॉर्ड ऑफिसरला बोलावून विचारणा केली आणि तातडीनं कारवाई करण्यास सांगितले.
हे बांधकाम अवैध असल्याची तक्रारही स्थानिक रहिवासी आदित्य पांडे यांनी केली होती. तिथून निघून जात असताना संध्या दोशी आणि त्यांचे पती विपुल दोशी तिथे आले आणि त्यानंतर वातावरण तापलं. त्यावेळी संध्या दोशी आणि त्यांचे पती विपुल दोशी यांनी तक्रारदार आदित्य पांडे यांना धमकावलं आणि पिस्तुल रोखल्याची गुन्ह्यामध्ये नोंद आहे. या गुन्ह्यामधे संध्या दोशी, विपुल दोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नावं आहेत. याच दरम्यान शिवसेनेच्या नगरसेविका संध्या भाजपा नगरसेविका अंजली खेडेकर, आदित्य पांडे, अनुमान मेखला, उज्वला कदम, रोशन कुमावत यांच्याविरोधात बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.