मुंबई / प्रतिनिधी -
घाटकोपर दामोदर पार्कजवळील सिद्धी साई हि चार मजली इमारत २५ जुलैला कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्तांनी एका चौकशी समितीची नेमणूक केली आहे. या चौकशी समितीला १५ दिवसात आपला अहवाल द्यायचा होता. मात्र अद्यापही या दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली नसल्याने चौकशी समितीला १० दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे.
घाटकोपर दामोदर पार्कजवळील सिद्धी साई हि चार मजली इमारत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले होते. इमारतीच्या तळमजल्यावर बंद असलेल्या सितप नर्सिंग होमचे रेस्टोरंट बनवण्यासाठी इमारतीचे पिलर तोडून बांधकाम सुरु असताना हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी नर्सिंग होमचे मालक सुनिल सितप याच्या सह कामावर देखरेख करणाऱ्या मुकादमाला व बांधकाचे डिझाईन बनवणाऱ्या आर्किटेकला अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून न्यायालयात हजार केल्यावर त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
सितप हे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी असल्याने साई सिद्धी हि इमारत कोसळण्यापूर्वी पालिका अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहेत. पालिका अधिकारी यामध्ये दोषी असल्याचे म्हटले जात असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपायुक्त चंद्रशेखर चोरे व विनोद चिटोरे संचालक अभियांत्रिकी यांची चौकशी समिती जाहीर केली होती. या समितीला १५ दिवसात आपला अहवाल पालिका आयुक्तांना सादर करायचा होता. परंतू अद्याप या दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली नसल्याने पालिका आयुक्तांनी समितीला आणखी १० दिवसाची मुदत वाढ दिली आहे.