पत्रकारांनी वाचवले अनेक प्रवाश्यांचे जीव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 August 2017

पत्रकारांनी वाचवले अनेक प्रवाश्यांचे जीव


बचावासाठी महापालिका आणि अग्निशमन दल आले धावून 
मुंबई । प्रतिनिधी
मुंबईत २९ ऑगस्टला धो धो पाऊस पडल्याने संपूर्ण मुंबई जलमय झाली होती. या घटनेचे वृत्तसंकलन करण्यासाठी अनेक पत्रकार रस्त्यावर उतरले होते. मुंबईत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. या आणीबाणीच्या परिस्थिती पालिकेच्या वृत्तसंकलन करणाऱ्या या पत्रकारांनीपत्रकारितेचा वापर करून अनेक ठिकाणी संपर्क साधत रेल्वे लोकलमध्ये अडकलेल्या शेकडो प्रवाश्यांना वाचवले आहेत. नुसती बातमीसाठी पत्रकारिता न करता पत्रकार आणीबाणीच्या परिस्थिती लोकांचे जीवही वाचवू शकतो हे सिद्ध करून दाखवले आहे. या कठीण आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सर्व प्रवाश्याना बाहेर काढल्यानंतर हे तीनही पत्रकार बाहेर पडल्याने अपंग आणि महिला प्रवाश्यानी पत्रकारांनी दिलेले वचन पाळल्याने या पत्रकारांचे आभार व्यक्त केले आहेत.

२९ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता दैनिक राष्ट्रीय अधिकारचे मोहम्मद मुकीम शेख, दैनिक आपलं महानगरचे पत्रकार अजेयकुमार जाधव दुपारी दिड वाजता सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये कुर्ला आणि सायन लोकलमध्ये रुळावर पाणी साचल्याने अडकले. त्याच डब्ब्यात १२ ते १५ अपंग होते, त्यापैकी कित्येकांना दिसत नव्हते तर काहींना चालता येत नव्हते. या अपंगाबरोबर ८ महिन्याची गरोदर असलेली दैनिक सकाळची महिला पत्रकार उर्मिला देठे हि सुद्धा प्रवास करत होती. सायंकाळी रुळावरील पाण्याची पातळी वाढत होती, याच दरम्यान काही तरुण रुळावरून चालत चालले होते. ज्या अपंगांना थोडेफार चालता येत होते त्यांना अपंग डब्यातून खाली त्या तरुणांनी खाली उतरवून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. याच वेळी याच ट्रेनमध्ये सायन कडील लोकलच्या पहिल्या डब्यातून दैनिक नवशक्तीचे पत्रकार काशिनाथ म्हादे मदतीला धावून आले. या अपंग आणि गरोदर महिलेला काहीही झाले तरी सोडवून जायचे नाही असा निर्णय घेतला.

अपंग प्रवाश्यांना व गरोदर महिलेला पाण्यातून बाहेर काढणे मोठे जिकिरीचे काम होते. पाणी लोकलच्या दरवाज्यापर्यंत पोहचण्यास दिड फूट बाकी राहिले होते. अंधार पडल्यावर मात्र आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव झाल्यावर पालिकेच्या जनसंपर्क विभागाचे अधिकारी तानाजी कांबळे यांना संदेश देण्यात आला. त्यांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला कार्यरत केले. पालिकेतील दैनिक सकाळचे पत्रकार विष्णू सोनावणे, श्रीरंग सुर्वे, संजय जाधव यांनी सभागृह नेते यशवंत जाधव व मुख्य अग्निशमन दलाचे अधिकारी रहांदळे यांना परिस्थिती सांगितल्यावर रात्री आठ ते नऊच्या दरम्यान अग्निशमन दलाची एक टीम स्पॉटवर पाठवली. गरोदर असलेली महिला पत्रकार राज्य सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन, डीसीपी रेल्वे पोलीस यांना संपर्क साधून मदत मागवत होती. सार्विकडून एकच उत्तर मिळत होते. आम्ही टीम पाठवतो आहे. मात्र कोणीही येत नसल्याने प्रवाश्यांचा जीव टांगणीला लागला होता. प्रवाशांच्या सुटकेसाठी पालिकेचे सहाय्यक आयुक्त केशव उबाळे व एल विभागाचे सहाय्यक अभियंता गवळी अग्निशमन दलाचे अधिकारी रहांदळे व सांगळे पत्रकार अजेयकुमार जाधव व काशिनाथ म्हादे यांच्या सतत संपर्कांत होते. मात्र समोर आलेली गाडी आपल्याला न वाचवता पुढे गेल्याने प्रवाश्यांमध्ये आणखी भीती निर्माण करून गेली.

अग्निशमन अधिकारी सांगळे यांनी मागील लोकल ट्रेन व हुसेन सागर एक्सप्रेसमधील प्रवाश्यांना वाचवत असून त्यानंतर गाडी फिरवून तुमच्याकडे येत असल्याचे समजल्यावर प्रवाश्यांच्या जीवात जीव आला. अखेर रात्री एकच्या सुमारास अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले. एलबीएएस रोडकडून दोरी टाकून अग्निशमन कर्मचारी प्रवाश्यांपर्यंत पोहचले. अंतर खूप असले तरी एक नंबर ट्रकच्या बाजूला गटार होते. यामधून मार्ग काढत गरोदर महिला आणि दोन अपंग महिलांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान पालिका पत्रकारांनी चार नंबर ट्रॅकच्या बाजूला भिंत आहे. या भिंतीवरून बाहेर काढल्यास सोपे जाईल असा सल्ला दिला. अग्निशमन दल अधिकारी सांगळे यांनी तो सल्ला लगेच अंमलात आणला आणि बचाव कार्य सोपे झाले. बाजूच्या वस्तीमधील चौ खांब मित्र मंडळाचे कार्यकर्तेही भिंती पलीकडे प्रवाश्याना घेण्यासाठी धावून आले. या बचावा दरम्यान चार नंबरवरील लोकलमधील महिला व इतर शेकडो प्रवाश्याना बाहेर काढण्यात आले.

११ वर्षांच्या आयान खानलाही वाचवले - 
एक नंबर ट्रॅक वरून पाण्यातून चालत एक ११ वर्षीय मुलगा एकटाच सायनकडून कुर्ल्याच्या दिशेने चालला होता. पुढे नाला असल्याने त्यामध्ये हा मुलगा वाहून जाईल म्हणून त्याला पत्रकारांनी आतमध्ये ट्रेनमध्ये घेतले. आयन खुर्शीद खान हा मुलगा धारावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतला असल्याने तसे पोलिसांना कळवण्यात आले. रात्री या मुलाला अग्निशमन दलाने सर्व प्रवाश्यांबरोबर बाहेर काढल्यावर चुनाभट्टी बाजूस दादर रेल्वे पोलीस ठाण्यातील एपीआय वाजे यांची एक टीम होती. या टीमकडे या मुलाला पत्रकारांनी स्वाधीन केले. वाजे यांनी धारावी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मुलगा आमच्या ताब्यात असल्याची माहिती दिली.

Post Bottom Ad