मुंबई - मुंबईतील मानखुर्द येथील चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या परिसरात असलेली 25 एकर भूखंडावर भूमाफीयांनी अतिक्रमण करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे. 85एकर जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून ही जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. त्यासाठी शासन पाठपुरावा करत असून तेथील जमिनीवरील अतिक्रमण काढून ती जमीन सरकारच्या ताब्यात घेतली जाईल आणि त्याचा वापर अनाथ व अपंग मुलांसाठी केला जाईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानपरिषदेत दिली. मुंबईतील मानखुर्द येथील चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या परिसरात असलेल्या25 एकर भूखंडावर भूमाफीयांनी केलेल्या अतिक्रमणाबाबतची सदस्य हुस्नबानू खलिफे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या.
मुंडे म्हणाल्या, अतिक्रमण झालेल्या जागेवर कार्यवाही होऊन जागा शासनाकडे उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबत बैठक घेण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधन मिळावे. त्यांची वेळोवेळी परवड होऊ नये म्हणून त्यांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. बालकल्याण योजनेसाठी व मुलांच्या पुनर्वसनासाठी या जागेची संस्थेला आवश्यकता आहे. त्याकरिता जागेच्या भाडेपट्टयाचेनूतनीकरण करुन मिळण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, उपनगर यांना सादर करण्यात आलेला आहे. त्यावर जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी 22 जून 2017 रोजी सुनावणी घेऊन सदर प्ररकण निकालासाठी राखून ठेवले आहे. या लक्षवेधीमध्ये सदस्य भाई जगताप, प्रवीण दरेकर, हेमंत टकले, विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला होता.