मुंबई दि.९ ऑगस्ट २०१७ - मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांवर 57 ठिकाणी मोर्चे काढूनही सरकारकडून काहीच कार्यवाही झाली नसल्याच्या आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला असून सरकारच्या खोटारडेपणाचे एक पत्र त्यांनी आज विधान परिषदेत सादर केले.
विधान परिषदेचा आज कामकाज सुरु होताच ना. धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाव्दारे मराठा आरक्षणाच्या व मराठा क्रांती मोर्चाचा विषय उपस्थित केला. 57 ठिकाणी मोर्चे काढून आणि अनेक वेळा चर्चा करुनही समाजाच्या मागण्यांवर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आम्हाला आता चर्चा नको, तर निर्णय घ्या अशी मागणी त्यांनी लावून धरली. सरकारने या मोर्च्यांची कोणतीही दखल घेतली नसल्याचे सांगताना त्यांनी सरकारच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारे एक पत्र वाचून दाखविले. नागपूर येथील 14 डिसेंबर 2016 रोजीच्या मराठा क्रांती मोर्चानंतर एका शिष्ट मंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीतीच्या इतीवृत्ताची व बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाचा मागण्यांबाबत मागणीनिहाय करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांनी सरकारला मागितली असता अशी कोणती बैठक झाली नाही केवळ निवेदन स्विकारले असल्याचे सरकारच्या वतीने आपल्याला कळविल्याचे मुंडे म्हणाले. यावरुनच सरकार मोर्चाची आणि बैठकांची दखल घेत नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. दोन वेळा गोंधळामुळे कामकाज तहकूब झाले.