मुंबई दि.९ ऑगस्ट २०१७ -
कोपर्डी अत्याचार घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा यासारख्या विविध मागण्यांसाठी आज आझाद मैदानावर मराठा समाजाच्या वतीने प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. परंतु सरकारने या मराठा समाजाच्या कोणत्याही मागण्यांबाबत ठोस पाऊले उचलली नसून या मोर्चांच्या अंती सरकारने जुनीच आश्वासने नव्याने देऊन मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी केली.
याबाबत बोलताना ते म्हणाले मराठा जो पर्यंत मुंबईमध्ये थांबून होता तोपर्यंत सरकार प्रचंड हादरले होते, परंतु जसजसे मोर्चेकरी माघारी परतु लागले तेंव्हा सरकारने या मोर्च्याकडे दुर्लक्ष केले. आज विधिमंडळात शिष्ठमंडळासोबत आलेल्या मोर्च्यातील लहान मुलीं मुख्यमंत्र्यापुढे आपल्या मागण्या पोटतिडकीने मांडत होत्या परंतु मुख्यमंत्र्यांनी यापुर्वी ५७ मोर्चात जी आश्वासने दिली तीच आश्वासने त्यांना यावेळीही दिली. काही मागण्या पुर्ण करीत असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सारखे असे काही नियम व अटी घालायच्या की त्याचा लाभ गरजू विद्यार्थांना मिळूच नये. शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणत आहेत की स्मारकाच्या उभारणीसाठी टेंडर निघालेले आहे. लवकरच काम सुरु करु, मग आता पर्यंत टेंडर निघालेले नसताना स्मारकाच्या भुमीपुजनाचा घाट कशासाठी घातला होता ? असा सवाल यावेळी अजित पवार यांनी सरकारला केला.
मुख्यमंत्री आज म्हणत आहेत की प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी होस्टेल्स उभारु, मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात अभ्यासासाठी त्यांनी मंत्र्याची एक समितीची स्थापन करण्याचे आश्वासन दिले. मग आता पर्यंत सरकार काय झोपले होते काय ? मराठा समाजाला शांत करण्यासाठी अशा केवळ घोषणा करायच्या प्रत्यक्षात मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही करायची नाही असे या सरकारचे धोरण असल्याची टीका यावेळी अजित पवार यांनी केली.