मुंबई, दि.१५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयतर्फे प्रसिध्द केलेल्या ‘महाराष्ट्र वार्षिकी२०१७’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.
महाराष्ट्र वार्षिकी २०१७ या पुस्तकामध्ये महाराष्ट्राविषयी अधिकृत, वस्तुनिष्ठ व एकत्रित माहितीचा समावेश आहे. महाराष्ट्राची भूमी आणि लोक, राज्याची भौतिक वैशिष्ट्ये, भौगोलिक स्थिती, इतिहास, वन्यजीवन, संस्कृती, महाराष्ट्राविषयी सांख्यिकी स्वरुपाच्या बाबी, पर्यटन, उद्योग, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, रोजगार आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांची सांख्यिकी माहिती, वैशिष्ट्ये, शिक्षणसंस्था, सिंचन प्रकल्प, कृषी उद्योग, पर्यटन स्थळे आदी माहितीचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांची सविस्तर माहिती, विभागांचे उद्देश व कार्य, रचना, महत्त्वाच्या योजना, संपर्क क्रमांक व मंत्रीमंडळ निर्णय, महत्त्वाच्या शासकीय घटना, घडामोडी, उपक्रम,कार्यक्रम, पुरस्कार, महाराष्ट्राची मानचिन्हे, महाराष्ट्रातील भारतरत्न व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर, राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यपाल तसेच विधिमंडळ सदस्य आणि केंद्रीय व राज्य मंत्रीमंडळ, देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान, राज्यातील लोकसभा व राज्यसभा सदस्य यांचाही समावेश आहे.
महाराष्ट्र वार्षिकी २०१७ हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, शासकीय-निमशासकीय कार्यालये, अभ्यासक, ग्रंथालये, पत्रकार, राजकीय नेते, सामान्यज्ञानाची आवड असणारे सर्व वयोगटातील नागरिक यांना उपयुक्त आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने या पुस्तकाचे प्रथमच प्रकाशन करण्यात आले आहे. यातील माहिती एप्रिल २०१६ ते जून २०१७पर्यंतच्या कालावधीमधील आहे. या पुस्तकाची किंमत ३०० रुपये असून सर्व जिल्हा माहिती कार्यालयामध्ये उपलब्ध आहे.