मुंबईकरांच्या मदतीला धावून आले हजारो हात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 August 2017

मुंबईकरांच्या मदतीला धावून आले हजारो हात


मुंबई । प्रतिनिधी -
मंगळवारी सकाळ पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळी विश्रांती घेतली. धो -धो कोसळून उघडीप घेतल्यानंतर हळूहळू कोलमडलेली यंत्रणा पूर्वपदावर आली. आणि जागोजागी अडकलेल्या मुंबईकरानी सुटकेचा निश्वास सोडला. कोसळणाऱ्या पावसाच्या संततधारेने आभाळ फाटले की काय? या चिंतेत मुंबईकरांना 26 जुलैच्या पावसाची आठवण झाली. मात्र नेहमीप्रमाणे याला मुंबईकर सामोरे गेले. सरकारी यंत्रणेची वाट न पाहता अडकलेल्या मुंबईकरांच्या मदतीला हजारो हात धावून आले.

बुधवारी सकाळी पाऊस ओसरला व हळूहळू वाहतूक पूर्व पदावर यायला लागली. मात्र बुधवारीही पावसाचा जोर कायम असल्याचा हवामान खात्याच्या अंदाज असल्याने त्यापूर्वीच घर गाठण्यासाठी मुंबईकरानी धावपळ सुरु केली. रेल्वे वाहतूक कुर्ल्यानंतर पुढे हळूहळू पूर्व पदावर येत असल्याचे समजताच अनेकांनी बेस्ट बसेस व मिळेल त्या वाहनाने रेल्वे स्टेशन गाठले. हार्बर लाईन लवकर सुरु होईल ही शक्यता नसल्याने या मार्गावरील प्रवाशांनी बसेस व मिळेल त्या खासगी वाहनाने घर गाठले. सकाळी 11 नंतर पुन्हा पावसाने सुरुवात केली, तेव्हा लोकांनी कालचे क्षण नकोर बाबा म्हणत धावपळ केली. मात्र काही वेळातच पावसाने उघडीप केली. पण पावसाचे काय खरे नाही, असे म्हणत लवकर घरी कसे पोहचता येईल, हा प्रयत्न मुंबईकरांमध्ये दिसला. अनेकांना घरी गणेशोत्सवाच्या ठरलेल्या कार्यक्रमाला पोहचता आले नाही याची नाराजी असली तरी सुखरूप घरी पोहचल्याचा आनंदही होता. रेल्वे पटरीवरुन छातीभर पाण्यातून कसरत करीत रेल्वे स्थानक गाठणाऱ्या व् रात्र पावसात घालवणाऱ्या प्रवाशांच्या मदतीला हजारो हात धाऊन आले. सरकारी यंत्रणा रेल्वे स्थानकात फारशी दिसली नाही, मात्र मुंबईकर एकमेकांच्या मदतीला धावताना दिसले. आपुलकीचे प्रत्येक क्षण दिलासा देणारे होते. चहा, बिस्किट तर कुणी वडापाव, पुलाव -भात देऊन विचारपुस करणारेही होते.

Post Bottom Ad