मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईच्या आर ए किडवाई मार्ग पोलीस ठाण्याच्या संगनमताने गुंडांकडून लोकांना त्रास दिला जात असून प्राण घातक हल्ले केले जात आहेत. याबाबत तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे किडवाई नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी बहुजन परिषद, रिपब्लिकन फोर्सचे यशवंत गंगावणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पातुरकर परिषदेत गंगावणे बोलत होते.
आर ए किडवाई मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंड लियाकत शेख उर्फ बाबू चिंधी स्थानिक पोलीस ठाण्यातील काही अधिकारी यांच्याशी संगनमत करून मैहनुमा बी. गफूर शेख यांच्या मालकीच्या दुकानावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे. या अगोदरही साधारण २० ते २५ घरे आणि दुकानांवर शेख याने कब्जा मिळवला आहे. आपल्या दुकानावर कब्जा करण्याबाबत तसेच आपला मुलगा नाजीम शेख याला जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबतची तक्रार पोलुईस ठाण्यात दिली होती. या तक्रारींकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने आम्ही या ठिकाणहून मुंब्रा येथे आश्रय घेतला. मात्र त्या ठिकाणीही या गुंडाने येऊन ३ ऑगस्ट २०१७ रोजी माझा मुलगा नियाजवर प्राणघातक हल्ला केला. यावेळी मुंब्रा पोलिसांनी बाबू चिंधी याला अटक करून गुन्हा दाखल केला. किडवाई नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली त्याचवेळी जर पोलिसांनी दखल घेतली असती तर आज माझ्या मुलावर प्राणघातक हल्ला झालाच नसता. बाबू चिंधी याने माझे दुकान हडप करण्यासाठीच माझ्या मुलावर हल्ला केला असा आरोप मैहनुमा बी. गफूर शेख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकारांचुई चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलीस सहभागी असल्याने याची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी आम्ही पोलीस आयुक्त व मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यांच्याकडूनही न्याय न मिळाल्यास येत्या काही दिवसात आंदोलन करणार आहोत असा इशारा गंगावणे यांनी दिला आहे.