बीकेसीत सप्टेंबर पासून वातानुकुलीत ‘हायब्रीड’ बसेस चालवल्या जाणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 August 2017

बीकेसीत सप्टेंबर पासून वातानुकुलीत ‘हायब्रीड’ बसेस चालवल्या जाणार


मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईच्या बिकेसी म्हणजेच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे रोज हजारो लोक कामानिमित्त येत असतात. या प्रवाश्याना जवळच्या रेल्वे स्थानकातून ये जा करताना मोठ्या अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी आणि प्रवाश्याना गारेगार प्रवास देण्यासाठी ‘हायब्रीड’ बस सप्टेंबर पासून चालवल्या जाणार आहेत. या उपक्रमासाठी ‘एमएमआरडीए’ ‘बेस्ट’ला २५ बस देणार आहे. ‘बीकेसी’त हजारोंच्या संख्येने येणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी या बस फायदेशीर ठरणार आहेत. विशेष म्हणजे या बस चालवताना ‘बेस्ट’वर कोणताही आर्थिक भार येणार नाही. त्यामुळे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार असल्याची माहिती बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिली आहे.
वांद्रे कुर्ला संकुलात दररोज हजारोंच्या संख्येने मुंबईकर येत असतात. मात्र वांद्र, कुर्ला आणि शिव या ठिकाणाहून बीकेसीत पोहोचण्यासाठी त्यांची चांगलीच रखडपट्टी होते. या पार्श्वभूमीवर बीकेसीतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरण (एमएमआरडीए) ‘बेस्ट’ला या अत्याधुनिक बस देणार आहे. या बसची देखभाल आणि उत्पन्नाबाबत बेस्ट आणि एमएमआरडीए यांच्यात झालेल्या कराराला मंजुरीही मिळाली आहे. या बसची प्रवासी क्षमता ५९ इतकी असून ३१ प्रवासी बसून २८ प्रवासी उभ्याने प्रवास करू शकणार आहेत. आरामदायी सिट, थंडगार प्रवास, मोफत वायफाय, मोबाईल चार्जिंग आणि धक्के न बसणारी ‘हायब्रीड’ बस बीकेसीत सप्टेंबरपासून धावणार आहे. यामुळे बीकेसीत कामानिमित्त येणार्‍या हजारो प्रवाशांची दररोज होणारी लटकंती थांबणार असून ‘बेस्ट’च्या उत्पन्नातही भर पडणार आहे. या उपक्रमासाठी ‘एमएमआरडीए’ ‘बेस्ट’ला २५ बस देणार आहे. हायब्रीड बससाठी लागणारे ड्रायव्हर, कंडक्टर ‘बेस्ट’कडून पुरवले जाणार असून त्यांचा पगारही ‘बेस्ट’कडून दिला जाणार आहे. या गाड्या चालवल्यामुळे ‘बेस्ट’चे उत्पन्न वाढणार असून गाड्यांचा मेंटेनन्स मात्र ‘एमएमआरडीए’कडून केला जाणार आहे. विशेष म्हणजे या गाड्या चालवण्यामध्ये नुकसान झाल्यास या उत्पन्नाची भरपाई ‘एमएमआरडीए’कडून दिली जाणार आहे.

Post Bottom Ad