मुंबई / प्रतिनिधी -
केंद्रात भाजपा सरकार आल्यावर गोरक्षा आणि गोशाळा हा विषय सतत गाजत आहे. भाजपावर गोरक्षकांवरून टिका केली जात असताना मुंबई महानगरपालिकेत समाजवादी पक्षाच्या गटनेते असलेल्या रईस शेख यांनी गोवंडी- मानखुर्दमध्ये गोशाळा पालिकेने बांधल्यास समाजवादी पार्टी देखरेख व सुरक्षा करेल अशी हमी पालिकेच्या स्थायीस समितीत दिली आहे. मुंबईतील रहदारीस अडथळा निर्माण करणा-या बेवारस व भटक्या जनावरांना कोंडवाड्यात आणण्यासाठी असलेली पालिकेची चारही वाहने नादुरुस्त असल्याने पालिकेकडून नवीन वाहने खरेदी केली जाणार आहे. या प्रस्तावावर रईस शेख बोलत होते.
मुंबई व उपनगरांतील वेवारस व भटक्या जनावरांना पकडून कोंडवाड्यात सोडण्यासाठी पालिकेकडे असलेली चारही वाहने सद्या आयुर्मान संपल्याने बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे भटक्या गुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न ऎरणीवर आल्यानंतर पालिकेने नवीन चार वाहने खरेदी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. मात्र भटक्या जनावरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे चार वाहने सर्व वॉर्डांना अपुरी पडतील. त्यासाठी पालिकेने प्रत्येक वॉर्डामागे एक वाहन अशी सोय केल्यास ही समस्या दूर होण्यास मदत होईल, अशी मागणी नगरसेवकांनी केली. सध्या भटकी जनावरे रस्त्यावर, फुटपाथवर फिरत असल्याने रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. भटक्या जनावरांव्यतिरिक्त काही ठिकाणी रस्ते, फुटपाथवर जनावरे बांधून ठेवली जातात, यात गाईंचाही समावेश आहे. गोवंडी -मानखुर्दमध्ये मोठ्या प्रमाणात भटकी जनावरे फिरत असतात. येथे पुरेसा जागा आहे, त्यामुळे येथे गोशाऴा पालिकेने बांधावी अशी मागणी करीत पालिकेने गोशाळा बांधण्याचा निर्णय़ घेतल्यास समाजवादी पक्ष देखरेख व सुरक्षा करेल अशी ग्वाही दिली. मुंबईत भटक्या जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना कोंडवाड्यात आणण्यासाठी 4 वाहने अपूरी पडतील. प्रत्येक वॉर्डात एक वाहन उपलब्ध करावे अशी मागणी नगरसेवकांनी केली. दरम्यान चार वाहने खरेदी करण्याच्या सुमारे एक कोटी 21 लाख 89 हजार 528 रुपयाच्या प्रस्तावास स्थायी समितीत बुधवारी मंजुरी देण्यात आली.