मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या शाळांना दरवर्षी गणेशोत्सवासाठी पाच दिवसाची सुट्टी दिली जाते. यावर्षापासून मात्र महापालिका शाळांना गणेशोत्सवासाठी आठ दिवस सुट्टी मिळणार आहे. याबाबतच्या निर्णयाला शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षण-शिक्षकेतर कर्मचार्यांना फायदा होणार आहे. सलग आठ दिवस सुट्टी मिळाल्यामुळे मुंबईत कामानिमित्त राहणार्या शिक्षक-कर्मचार्यांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाता येईल. ही सुट्टी सलग असल्यामुळे त्यांना गौरी-गणपतीचा सण अधिक उत्साहाने साजरा करता येईल अशी माहिती शिक्षण समिती शुभदा गूढेकर यांनी दिली.
मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र मुंबईत कामानिमित्त असणार्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना पुरेशी सुट्टी मिळत नसल्याने त्यांना आपल्या गावी जाता येत नाही. गणेशोत्सवाचा आनंद लुटता येत नाही. या पार्श्वभूमीवर विविध शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या संघटनांनी शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांच्याकडे सुट्टी वाढवून देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या संयुक्त बैठकीत एकूण ७६ सुट्ट्यांपैकी दिवाळीच्या २ नोव्हेंबरपर्यंत असलेल्या दीर्घकालीन सुट्टीतील १ नाव्हेंबर आणि २ नोव्हेंबर रोजीच्या सुट्ट्या २४ ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट रोजी गौरी-गणपतीच्या सणाकरिता देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. शिक्षण समितीच्या बैठकीत नगरसेविका अंजली नाईक यांनी याबाबत विषय मांडला होता. त्याला शिक्षण समितीने मंजुरी दिली आहे.