मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईत गेल्या काही वर्षात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. अश्या इमारतीमध्ये आगीवर नियनटरं मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाला इमारती इतक्या उंचीच्या अत्याधुनिक शिडीची गरज असते. टोलेजंग इमारतीच्या पंचवीसव्या मजल्यापर्यंत पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवणारी अत्याधुनिक शिडी महापालिकेच्या अग्निशमन दलात दाखल झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या शिडीचे लोकार्पण करण्यात आले.
मुंबईकारांवर आलेल्या प्रत्येक संकटात जीवाची बाजी लावून मदतकार्य करणार्या पालिकेच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रणा आणली जात आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये ८१ मीटर उंचीचे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, १७ जलद प्रतिसाद वाहने, सहा फायर इंजिन नव्याने दाखल झाली. याशिवाय आग आणि धुरामध्ये काम करण्याचे कौशल्य शिकवणारे प्रशिक्षण केंद्रही मुंबई अग्निशमन दलाच्या वडाळा कमांड सेंटरमध्ये सुरू करण्यात आले. या नव्या तंत्रज्ञानाचे प्रात्याक्षिकही आज सादर करण्यात आले. पालिकेच्या अग्निशमन केंद्राला सक्षम बनवणार्या साधनसामग्रीचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी कौतुक केले. या अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे आपत्कालिन स्थितीत मुंबईकरांना तत्काळ सुविधा देण्यास मदत होईल असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच मुंबईकरांचा जीव संकटात असताना अग्निशमन दलाचे कर्मचारी स्वत:चा जीव संकटात घालून इतरांचे जीव वाचवतात. त्यांचे कार्य सीमेवर लढणार्या सैनिकांप्रमाणेच आहे. त्यामुळे अग्निशमन दलातील कर्मचारी हेदेखील आपले ‘जवान’च असल्याचे यावेळी ठाकरे यांनी स्पष्ट केले. अत्याधुनिक यंत्रणा असलेले पालिकेचे अग्निशमन दल देशातील पहिलेच अत्याध्युनिक दल असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावरक, सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर, नगरसेविका श्रद्धा जाधव, तृष्णा विश्वासराव, मंगेश सातमकर, स्मिता गावकर, आमदार तमील सेल्वन, कालिदास कोळंबकर, अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन, प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे आदी उपस्थित होते. अग्निशमन दलात नव्याने दाखल झालेल्या वॉल थ्रॉट नोझलचा वापर करून भिंतीच्या पलीकडील आग भिंतीमध्ये नोझल टाकून विझवता येणार आहे. यामुळे इमारतीच्या आत प्रवेश न करता आगीवर नियंत्रण मिळवता येणार आहे. हाय प्रेशर गनच्या माध्यमातून आगीवर पाण्याचा फवारा करता येणार आहे. शिवाय कुठेही नेता येणारी पोर्टेबल रिचार्जेबल लाइट सुटकेस उपलब्ध करून देण्यात आली आहे.