भाजपाची हीच पारदर्शकता आहे का ? - संजय निरुपम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 August 2017

भाजपाची हीच पारदर्शकता आहे का ? - संजय निरुपम

प्रकाश मेहता चोर है च्या घोषणांनी घाटकोपर दणाणले -
निरुपम यांच्या सह अनेकांना अटक व सुटका - 
मुंबई / अजेयकुमार जाधव -
एसआरए घोटाळा प्रकरणात सहभागी असलेल्या गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी मेहता यांच्या घाटकोपर येथील घरावर शनिवारी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. यावेळी मोर्चाला संबोधित करताना प्रकाश मेहता यांच्याबाबत रोज मीडियामध्ये बातम्या येत आहेत, विधानसभेचे कामकाज बंद पडले आहे. मेहता यांनी बिल्डरला फायदा पोहचवल्याचे स्पष्ट झाले आहे. मेहता यांच्या सह आणखी १२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असल्याने भाजपाची हीच पारदर्शकता आहे का ? पार्टी विथ डिफरंस यालाच म्हणतात का ? असे प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री राजीनामा घेत नसल्याने आम्ही मेहता यांचा राजीनामा सोबत घेऊन आलो आहोत. या राजीनामा पत्रावर मेहता यांनी सही करावी असे आवाहन निरुपम यांनी यावेळी केले.

मोर्चाला संबोधित करताना, गुजरात मध्ये अतिवृष्टीमुळे गरीब लोकांचे हाल झाले आहेत. या गरिबांचे हाल पाहण्यासाठी प्रधानमंत्री हेलिकॉप्टरन फिरून गेले. मात्र याच गरीब लोकांचे दुःख वाटून घेण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेले असता भाजपावाल्यानी त्यांच्यावर दगडफेक केली असा आरोप निरुपम यांनी यावेळी केला. भाजापा सरकार ज्या राज्यात सत्तेवर आहे त्या ठिकाणी एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यास विरोधी पक्षांनी त्यांच्या नेत्यांनी लोकांना भेटण्यास भाजपाकडून विरोध का केला जातो ? अश्या दुःखी लोकांना विरोधी पक्षांनी भेटायला भाजपाची बंदी कशाला असे प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केले. गुजरात मधील राज्यसभेची जागा अमित शाह याना जिंकायची असल्याने काँग्रेस आमदारांना भीती दाखवली जात आहे. १५ करोड रुपयांची ऑफर दिली जात आहे. पैसे घेऊन अमित शाह याना मतदान करा अन्यथा इडी आणि इतर विभागाची चौकशी लावण्याची धमकी दिली जात असल्याचे निरुपम यांनी सांगितले.

या मोर्चात संजय निरुपम यांच्यासह सचिन सावंत, माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा, नगरसेवक नियाज वणू, अश्रफ आझमी यांच्या सह अनेक पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी "प्रकाश मेहता का उलटा चष्मा", मेहता यांचा राजीनामा असलेले, घोटाळेबाज मेहता यांची हकालपट्टी करा, देवेंद्रजी हीच का तुमची पारदर्शकता, सरकारचे मंत्री नाहीत बिल्डरचे दलाला आहेत असे अनेक फलक घेऊन कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चात सहभागी झालेल्या हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी "चोर है भाई चोर है, प्रकाश मेहता चोर है", च्या घोषणांनी घाटकोपर परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान संजय निरुपम यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.

निरुपम यांच्या सह अनेकांना अटक व सुटका - 
प्रकाश मेहता यांच्या घरावर काढलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांनी मेहता यांच्या घरापर्यंत तीन ठिकाणी बॅरिकेट्स लावले होते. यापैकी पहिले बॅरिकेट्स पार करून काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेहता यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना दुसऱ्या बॅरिकेट्स जवळ अटक करून ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. याच दरम्यान संजय निरुपम यांच्यासह हजारो कार्यकर्ते मेहता याना भेटून त्यांची राजीनाम्यावर सही घेण्यासाठी मेहता यांच्या घरावर चाल करून गेले असता निरुपम यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पंतनगर पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्याबाहेरही कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. अखेर निरुपम यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.

Post Bottom Ad