मुंबई दि. ३ : महा –डीबीटी व महावास्तू पोर्टलमुळे सामान्य माणसाला पारदर्शी व गतिमान सेवा मिळतील असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यासाठीमहा–DBT व महावास्तू या पोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाला. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, जलसंधारण मंत्री राम शिंदे, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, आर.टी. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या योजनेमुळे गतिमान सेवा मिळण्यास मदत होणार आहे, योग्य आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शीपणे मदत पोहचेल. महावास्तू पोर्टलमुळे घर बांधणीसाठी नकाशा मंजूर करणे तसेच इतर बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळणे सहज व सोपे होणार आहे. सामान्य माणसाला आपला विविध परवानगीसाठी देण्यात आलेल्या प्रस्तावाचे शेवटपर्यंत ट्रॅकिंग करता येईल. या डिसेंबरपर्यंत या योजनेअंतर्गत तीन टप्प्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणण्यात येतील.
आपले सरकार वेब पोर्टलच्या माध्यमातून १ कोटी लोकांना सेवा देण्यात आली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, महा DBT योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम थेट जमा होईल, यामुळे यामध्ये अधिक पारदर्शकता येईल. शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर संबधित संस्थेला माहिती देण्यात येईल.
महा-DBT व महावास्तू पोर्टल योजनेची माहिती, माहिती तंत्रज्ञान सचिव व्ही. के. गौतम यांनी प्रास्ताविकात दिली. ते म्हणाले या योजनेअंतर्गत ४३ सेवा आणण्यात आल्या आहेत. ५० लाख विद्यार्थी यात सहभागी होतील. शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करुन देण्यात आल्या असून सर्व व्यवहार ऑनलाईन होणार आहेत.