मुंबई, दि. १५: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातून तयार झालेले युवक समाजासाठी उत्तम काम करतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, चलेजाव आंदोलनाचे हे ७५वे वर्ष सुरु आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निमित्ताने आवाहन केले की, नवभारत घडविण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे. सर्व युवकांनी भारतासाठी एकत्र येऊन सर्वच क्षेत्रात वर्चस्व मिळविले पाहिजे. हा प्रधानमंत्र्यांचा संदेश युवकांनी लक्षात घेऊन पुढील वाटचाल करायची आहे. युवा शक्तीची ताकद मोठी आहे. देशातील 65 टक्के युवक हे 25 वर्षांचे आहेत. त्यांच्यात गुणवत्ता आहे. अशा युवकांना प्रशासनात सहभागी करुन घेतले पाहिजे.
युवकांचे कौतुक करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, तुमच्या नवीन विचार पद्धतीने समाजात, देशात बदल होऊ शकतात. एवढी प्रचंड ताकद, ऊर्जा तुमच्यात आहे. ज्यावेळी नवीन मुद्दा, विचार घेऊन आपण समाजापुढे जातो. तेव्हा समाजात परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम जेव्हां सुरु केला त्यासाठी जवळपास १७हजार जनांनी अर्ज केले. त्यात २६राज्यातील मुलांनीही अर्ज केले होते. त्यातून सुरुवातीला ४ हजार मुले निवडली. पुढे त्यातून दोनशे, पुन्हा “द बेस्ट” ५० मुले निवडली.
ही मुले अस्सल हिरे आहेत. त्यांना उत्तम प्रकारे पैलू पाडण्याचे काम या प्रशिक्षणाच्या निमित्ताने प्रशासनाने केले आहे. हेच हिरे आता समाजात जाऊन अधिक चमकणार आहेत. त्यांच्या हातून देशाची व समाजाचीही चांगली सेवा घडेल. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ४४ युवकांना प्रमाणपत्रे प्रदान केली. त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी निवड झालेल्या युवकांचे स्वागत केले.