मुंबई / प्रतिनिधी -
आर्थिक स्थिती खराब असलेल्या बेस्टला मदत करण्यासाठी मागे पुढे करणाऱ्या पालिका प्रशासनाने आरटीओला रिक्शा-टॅक्सी स्टँडचे बोर्ड लावण्यासाठी तब्बल ६२ लाख लाख रुपये मंजूर केले आहेत. या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेनेनेसह सर्वच पक्षीय नगरसेवकांनी विरोध केला असला तरी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मुंबईत विविध ठिकाणी असलेल्या रिक्शा-टॅक्सी स्टँडवरचे खराब झालेले बोर्ड महापालिका प्रशासनाने नव्याने लावावेत अशी मागणी आरटीओकडून करण्यात आली होती. याला पालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत ६२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या प्रस्तावाला जोरदार आक्षेप घेत महापालिकेला कोणतीही परवानगी देण्यासाठी लटकवणार्या आरटीओसाठी पालिका प्रशासन पायघड्या का घालते असा सवाल शिवसेनेचे आशीष चेंबूरकर यांनी केला. आरटीओने तयार केलेल्या रिक्शा-टॅक्सी स्टँडमुळेही बेस्ट घाट्यात चालत असल्याचेही चेंबूरकर म्हणाले. तर पालिकेने सीएसआर फंड तयार करून कंपन्यांच्या माध्यमातून असे बोर्ड लावावेत असे सभागृह नेते यशवंत जाधव म्हणाले.