मुंबई / प्रतिनिधी -
बृहन्मुंबई महापालिकेच्या ५ उदंचन केंद्रांमधून दररोज सरासरी २१ हजार ७६२ दशलक्ष लीटर पाण्याचा उपसा करण्यात येऊन ते पाणी समुद्रात सोडण्यात आले. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील हाजिअली, वरळी, वरळी गाव, रे रोड, जुहू इत्यादी परिसरांमध्ये पावसाच्या कालावधीत पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होण्यास मदत झाली. यामुळे या उदंचन केंद्राच्या परिसरांमध्ये पावसाचे पाणी साचण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाल्याची माहिती पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे प्रभारी प्रमुख अभियंता विद्याधर खंडकर यांनी पालिका आयुक्तांनी आयोजित मासिक आढावा बैठकी दरम्यान दिली.
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महापालिका अधिका-यांची मासिक आढावा बैठक आज सकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन,अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाट यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना दि. १५ मे २०१७ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत हाजिअली उदंचन केंद्र एकूण १४७ तास कार्यरत होते. या कालावधीत दररोज सरासरी ३ हजार १९२ दशलक्ष लीटर पाण्याचा उपसा करण्यात आला. याच कालावधी दरम्यान जुहू परिसरातील इर्ला पंपिंग स्टेशन हे एकूण २८८ तास चालू होते; तेथे दररोज सरासरी ६ हजार २२९ दशलक्ष लीटर पाणी उपसण्यात आले. वरळी परिसरातील लव्हग्रोव्ह उदंचन केंद्र हे एकूण १३२ तास चालू होते; यातून दररोज सरासरी २ हजार ८५९ दशलक्ष लीटर पाणी उपसा करण्यात आला. वरळी गाव परिसरातील क्लिव्हलँड बंदर हे उदंचन केंद्र दि. १५ मे ते ३१ जुलै २०१७ या कालावधी दरम्यान २०१ तास सुरु होते; या दरम्यान दररोज सरासरी ४ हजार ३५८ लीटर उपसा तेथे करण्यात आला. याच कालावधी दरम्यान रे रोड परिसरातील ब्रिटानिया उदंचन केंद्र हे एकूण २३७ तास सुरु होते; या दरम्यान तेथे दररोज सरासरी ५ हजार १२४ दशलक्ष लीटर पाण्याचा उपसा करण्यात आल्याची माहिती खंडकर यांनी दिली.