मुंबईतील वारसा जपण्यासाठी लोकसहभागही महत्त्वाचा - रमानाथ झा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 August 2017

मुंबईतील वारसा जपण्यासाठी लोकसहभागही महत्त्वाचा - रमानाथ झा


मुंबई / प्रतिनिधी -
"बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पुरातन वास्तूंचे, वारश्याचे जतन व्हावे यासाठी करण्यात येणा-या विविध प्रयत्नांना हातभार लावण्यास 'मुंबई वारसा जतन समिती' सदैव कटीबद्ध आहे. तसेच हा वारसा जपण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होण्यासह स्वयंसेवी संस्थांनी देखील पुढे येणे गरजेचे आहे”, असे प्रतिपादन मुंबई वारसा जतन समितीचे अध्यक्ष रमानाथ झा यांनी आज केले. परळ परिसरात दोनशे वर्ष जुन्या व सुशोभिकरणासह पुनर्स्थापित करण्यात आलेल्या मैलाच्या दगडाचे अनावरण करतेवेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक तथा बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ, एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे देखील उपस्थित होते.

एप्रिल महिन्यात परळ मधील डॉ. एस. एस. राव मार्गावर अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यासह रस्ता व पदपथ दुरुस्तीचेही काम महापालिकेद्वारे सुरु होते. याच कार्यवाही दरम्यान महापालिकेच्या पथकाला पदपथामध्ये अर्धवट गाडला गेलेला मैलाचा दगड सापडला. हा दगड साधारणपणे दोनशे वर्षांपूर्वी म्हणजेच इ. स. १८१८ ते १८३६ च्या दरम्यान बसविण्यात आला होता. त्याकाळी फोर्ट परिसरातील 'सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च' हा मुंबईचा प्रारंभिक बिंदू मानून त्यापासूनचे अंतर दर्शविण्यासाठी मुंबई शहरात मैलाचे दगड बसविण्यात आले होते. परळ परिसरातील जुन्या गव्हर्नर हाऊसजवळ असणा-या या मैलाच्या दगडावर रोमन लिपीमध्ये 'पाच' ( V ) हा आकडा लिहीलेला आहे. ज्याचा अर्थ सेंट थॉमस कॅथेड्रल पासून या मैलाच्या दगडाचे अंतर हे पाच मैल (सुमारे ८.०५ किमी) एवढे आहे.

परळ परिसरात महापालिकेच्या कामादरम्यान सापडलेल्या या ऐतिहासिक दगडाचे महत्त्व लक्षात घेऊन महापालिकेच्या 'एफ दक्षिण' विभागाच्या पुढाकाराने या मैलाच्या दगडाची पुनर्स्थापना व आजुबाजूच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. हा दगड रात्री देखील ठळकपणे दिसावा यासाठी या दगडावरती सौरउर्जेने प्रकाशमान होणारा दिवा बसविण्यात आला आहे. या पाचव्या मैलाच्या दगडाच्या बाजूला त्याची माहिती देणारा शिलालेखही बसविण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे काम करण्यासाठी 'डी एण्ड जे फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे.

त्याचबरोबर या उपक्रमास मदत करणा-या 'डी एण्ड जे फाऊंडेशन'चे रमेश जैन, वास्तूरचनाकार तपन मित्तल – देशपांडे, वारसा जतन कार्यकर्ता भारत गोठोस्कर यांच्यासह परिसरातील मान्यवर नागरिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. मैलाच्या दगडाच्या अनावरण कार्यक्रमानंतर या विषयावर एक विशेष संगणकीय सादरीकरण महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. घुले आवर्जून उपस्थित होत्या. याच कार्यक्रमादरम्यान मैलाच्या दगडाची पुनर्स्थापना व सुशोभिकरण करणासाठी हातभार लावणा-यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Post Bottom Ad