मुंबई । प्रतिनिधी -
गत काही दिवसात घडलेल्या घटना बघता मुले कुटुंबापासून दूर जात असून याला आळा घालण्यासाठी महापालिका शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बुध्यांकासोबतच त्यांचा भावनांक कसा वाढीस लागेल याचा प्रयत्न करणे सुध्दा आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. बृहन्मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने मुंबई पब्लिक स्कूल (एम.पी.एस.) इंग्रजी शाळा कांदिवली (पूर्व), ठाकुर गाव येथे नव्याने सुरु करण्यात आली असून या नूतन इमारतीचे लोकार्पण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना परिसरातील गोरगरीब नागरिकांचे मुले इंग्रजी माध्यमांचा शाळेत शिकावे यासाठी स्थानिक नगरसेविका माधुरी योगेश भोईर यांनी अथक प्रयत्न करुन ही इंग्रजी माध्यमातील शाळा शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करुन सुरु करुन घेतली, याचा अतिशय आनंद होत आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असताना मातृभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही, याची सुध्दा पालकांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे महापौर म्हणाले. त्याचप्रमाणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचन व लेखन आलेच पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करावा असेही महापौर म्हणाले. या शाळेचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौरांनी केले.
शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, स्थानिक नगरसेविका भोईर दांम्पत्यांनी शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने आज हा चांगला क्षण अनुभवता आला असून याबद्दल त्यांनी भोईर दांम्पत्यांना धन्यवाद दिले. चांगल्या प्रतिचे शिक्षण देण्यासाठी महापालिका कटिबध्द असून एकजुटीने प्रयत्न केल्यास यापुढेही आणखी चांगले काम करणे सर्वांना शक्य होणार असल्याची आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी स्थानिक नगरसेविका माधुरी योगेश भोईर, नगरसेविका प्रितम पंडागळे, माजी नगरसेवक योगेश भोईर, शिक्षणाधिकारी महेश पालकर, आर/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त (प्र.)महादेव शिंदे तसेच संबंधित अधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.