मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईमधील कचऱ्याची व्हिलेवाट लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेचे आहे. महापालिकेकडे ओला आणि सुका कचरा वेगवेगळा उचलण्याचे नोयोजन नसतानाही मुंबईकर नागरिकांवर मात्र ओला आणि सुका कचऱ्यांचे वर्गीकरण करण्याची सक्ती केली जाणार आहे. त्यासाठी गृहनिर्माण सोसयट्याना आवारात तसेच संकलन केंद्र सुरु करण्याचे सक्तीचे केले जाणार आहे. पालिकेकडून अशी सक्ती केली जाणार असताना भाजपाच्या नगरसेवकांनी कचऱ्याची व्हिल्हेवाट लावण्यासाठी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका काही उपाययोजना सुचवल्या आहेत. एकीकडे पालिका आपली जबाबदारी नागरिकांवर ढकलत असताना नगरसेवकांनी पुढाकार घेत कचऱ्याचे प्रमाण करण्यासाठी उपायोजना सुचवल्या आहेत. या सूचनांना पालिकेच्या महासभेत मंजुरी मिळाल्याने लवकरच त्यावर पालिकेकडून अंमलबजावणी केली जाण्यार आहे.
भाजपाच्या नगरसेविका नेहल शाह यांनी मुंबईतील गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये उपहारगृहे आणि मंड्या इत्यादी ठिकाणी जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प राबवण्याकरता खतनिर्मिती पेट्या महापालिकेच्या वतीने पुरवण्यात याव्यात, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. तयार होणाऱ्या खताचा वापर त्याच संकुलातील, त्याच आवारातील अथवा परिसरातील उद्यानांत करण्यात यावा असे म्हटले आहे. नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी महापालिका प्रशासन फक्त गणेशाेत्सव व नवरात्रोत्सव या सणांवेळीच निर्माल्य अर्पण करण्यासाठी मुंबईतील समुद्र तटांवर निर्माल्यकलश उपलब्ध करुन देते, इतर वेळी निर्माल्य कलशाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे निर्माल्य समुद्रातच टाकले जाते. समुद्राच्या लाटेबरोबरच वाहून आलेल्या निर्माल्यामुळे किनारे अस्वच्छ होतात, यामुळे सर्व समुद्र किनाऱ्यांवर निर्माल्याचे विघटन होऊन सेंद्रीय खत तयार करण्यासाठी योग्य ती शास्त्र आधारीत व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. नगरसेविका ज्योती आळवणी यांनी नवीन इमारतींच्या बांधकामांची परवानगी देताना त्या इमारतींमध्ये तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी इमारतींच्या आवारातच विकासकाने ओल्या कचऱ्याकरता खड्डे तयार करणे बंधनकारक करण्यात यावे, अशी अट आराखडा ना पसंतीच्या सूचनेमध्ये (आयओडी) अंतर्भूत करण्यात यावी, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. या तीनही ठरावाच्या सूचना महासभेत मंजूर झाल्या असून पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आल्या आहेत. पालिका आयुक्तांनी सकारात्मक अभिप्राय दिल्यावर त्याची अंमलबजावणी केली होणार आहे. या नगरसेवकांच्या सूचनांमुळे डंपिंग ग्राऊंडवर कचरा वाहूून नेण्यावर होणारा खर्च वाचणार आहे.