मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईतील कचरा वाहून नेण्यासाठी महापालिका काही वर्षांपासून भाडे तत्वावर गाड्या घेते. अश्याच गाड्याच्या खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूरीसाठी आला हाेता. या प्रस्तावात तब्बल आठ काेटीं रुपयांचे व्हेरीएशन असल्याने ही पालिकेची लूट असल्याचा आराेप भाजपाने केला. तसेच या पूर्वी केलेल्या कामाची चाैकशी करण्याची मागणी सदस्यांनी स्थायी समितीत केली.
मुंबई शहरात जमा झालेला कचरा उचलणे आणि क्षेपणभूमीपर्यंत वाहून नेणे हे काम मे. एस. के. आय. पी. एल. एम. के.- डी. आय (जेव्ही) या लघुत्तम निविदाकारास 96 काेटी रुपयांना दिले हाेते. आता याच कंत्रादाराला पुन्हा हे काम देण्यात येणार आहे. येत्या 24 डिसेंबर पर्यंतचा कालावधी त्यासाठी नमूद करण्यात आला आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. कंत्राटाचा कालावधी वाढवून देताना आठ कोटी रुपयांचे व्हेरीएशन प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. याला भाजपाचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी जोरदार आक्षेप घेतला. कंत्राटदाराला सहा महिने वाढवून देताना, कंत्राटदाराने यापूर्वी केलेल्या कामांचा अहवाल स्थायी समितीला सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनीही व्हेरीएशनला विरोध केला. पालिकेने शासकीय आणी खासगी जागांवरील कचरा उचलावा अशी मागणी रवी राजा यांनी केली. यावर पालिका अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी उत्तरात सारवासारव करत कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यासाठी समर्थन केले. याबाबत समान धोरण तयार करावे लागले, असे सिंघल यांनी स्पष्ट केले. त्यानंतर हा प्रस्तावाला मंजुर करण्यात आला.