जुलै महिन्यात २४ हजार ८९४ फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 August 2017

जुलै महिन्यात २४ हजार ८९४ फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई


२ कोटी ३५ लाख रुपयांचा माल जप्त, २८ लाख ३४ हजार ५२७ रुपयांची वसूली -
मुंबई / प्रतिनिधी -
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते यांच्या विरोधात महापालिकेच्या अनुज्ञापन खात्याद्वारे धडक कारवाई केली जात आहे. उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलने) रणजीत ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार दि. १ जुलै ते ३१ जुलै २०१७ या एका महिन्याच्या कालावधीत संपूर्ण महापालिका क्षेत्रात २४ हजार ८९४ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान सुमारे २ कोटी ३५ लाख ६१ हजार ४७३ रुपये एवढ्या विमोचन आकाराचा माल जप्त करण्यात आला. तर या महिन्यात करण्यात आलेल्य कारवाईपोटी व लिलावातून एकूण रुपये २८ लाख ३४ हजार ५२७ एवढा दंड महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे, अशी माहिती अनुज्ञापन अधिक्षक शरद बांडे यांनी दिली आहे.

दि. १ जुलै ते ३१ जुलै २०१७ या एक महिन्याच्या कालावधीत महापालिका क्षेत्रात अनधिकृतपणे रस्त्यांवर / पदपथांवर व्यवसाय करणा-या फेरीवाल्यांवर / विक्रेत्यांवर नियमितपणे कारवाई करण्यात आली. ही कारवाई सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही सत्रांमध्ये करण्यात आली आहे. यानुसार गेल्या महिन्यात एकूण २४ हजार ८९४ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान ११५० हातगाड्या, ८४१ सिलिंडर्स, ६२ टेबल स्टॉल्स व १३ उसाचे चरक जप्त करण्यात आले. त्याचबरोबर ६ हजार १४० नाशवंत पदार्थ विक्रेते, ७ हजार ३९३ अनाशवंत पदार्थ विक्रेते, ९ हजार २९५ अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दि. १ जुलै ते ३१ जुलै २०१७ या एका महिन्याच्या कालावधी दरम्यान 'जी उत्तर' विभागात सर्वाधिक म्हणजे ३ हजार २५० अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. त्याखालोखाल 'ए' विभागात १ हजार ६५४, तर 'के पूर्व' विभागात १५६० एवढ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच सर्वाधिक वसूली ही 'एच पश्चिम' विभागातून रुपये २ लाख ५६ हजार ७८२ एवढी करण्यात आली, तर त्या खालोखाल 'के पूर्व' विभागात रुपये १ लाख ८९ हजार ३४८, 'एफ उत्तर' विभागातून रुपये १ लाख ४७ हजार तर 'एन' विभागातून १ लाख ४५ हजार ८०६ एवढी रक्कम वसूल करण्यात आली. या रकमेत दंड रक्कम व लिलावातून प्राप्त रकमेचा समावेश आहे, अशीही माहिती अनुज्ञापन अधिक्षक बांडे यांनी दिली आहे.

Post Bottom Ad