मुंबई । प्रतिनिधी
मुंबईवर मंगळवारी ओढवलेल्या परिस्तिथीला असाधारण हवामान कारणीभूत आहे. सकाळी आठ ते रात्री आठ या बारा तासात ३२५ मी. मी. पाऊस पडने मुंबईत पाणी तुंबल्याचे प्रकार घडल्याचे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगत पालिकेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
काल दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान केवळ दोन तासात सरासरी २०० मी. मी. पाऊस म्हणजेच ६० टक्के पाऊस पडल्याचे आयुक्तांनी सांगितले . मुंबईतील २३ ठिकाणी १२ तासात २०० मी. मी. पाऊस झाला . तर २६ ठिकाणी ५० मी. मी. पेक्षा जास्त पाऊस झाला . त्यात एका तासात भांडुप , माटुंगा , वरळी आणि कुर्ला भागात ९० मी मी पेक्षा जास्त पाऊस पडल्याचे आयुक्तांनी सांगितले , या काळात पालिकेने ३१३ पंपांपैकी २२९ पंप सुरु केले होते त्या व्यतिरिक्त पाच पम्पिंग स्टेशनमध्ये २६ पंपांद्वारे पाणी बाहेर काढण्यात आले. काल पालिकेचे ३० हजार कामगार पंप सुरु ठेवणे , जमा झालेला कचरा बाजूला काढणे , मेनहोल उघडणे इत्यादी कामांसाठी कार्यरत होते , मलनिःसारण वाहिन्यांद्वारे ११० पंपांद्वारे पाणी बाहेर काढले गेल्यामुळे दररोजच्या १७७० दशलक्ष लिटर्सच्या जागी काल ३ हजार ७५६ दशलक्ष लिटर्स पाणी वाहून नेल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
पाणी तुंबल्यामुळे जमा झालेला कचरा साफ करण्यासाठी पालिकेचे २६ हजार कामगार काम करीत असून आतापर्यंत पाच हजार मेट्रिक टन कचरा उचलला गेला आहे. या काळात ट्रेनमध्ये अडकलेल्या ४२५ प्रवाशांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले , तर घरी पोहोचू न शकलेल्या जनतेसाठी पालिकेने ७० शाळांमधून राहण्याची व्यवस्था केली होती, आपापसातील कम्युनिकेशन बंद झाल्यास यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून हॅम रेडिओ ऑपरेट करण्यात आले होते, त्याचप्रमाणे एनडीआरएफची टीम मदतीसाठी होती, नेव्ही , एअरफोर्सही तयार होते परंतु सुदैवाने त्यांची आवश्यकता लागली नाही. पालिकेला पम्पिंग स्टेशनचा मोठा फायदा झाल्याचे सांगत त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचरा होण्यास मदत झाल्याचे आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. पायाभूत सुविधांच्या क्षमतेपेक्षा असाधारण पाऊस पडल्याचेही आयुक्तांनी सांगितले , काल पालिकेकडून सुमारे ७ हजार दशलक्ष लिटर्स पाणी बाहेर काढल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कालच्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लोकांनी पाणी उकळून प्यावे . असा सल्ला पालिका आयुक्तांनी दिला आहे , पालिकेकडून विविध ठिकांणांवरून पाण्याचे नमुने गोळा करण्यात येत आहेत , साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा केला जात असून डेंग्यू मलेरिया साथ पसरू नये यासाठी मोठ्या प्रमाणात धूम्र फवारणी केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले , जर कोणास ताप , उलटी आल्यास त्यांनी त्वरित पालिका दवाखान्यात उपचारासाठी यावे , १७५ ठिकाणी लेप्टो , गेस्ट्रो , सारख्या आजारावर सर्व औषधें उपलबध केली असल्याचेहि आयुक्तांनी स्पष्ट केले , त्याचप्रमाणे गणेश विसर्जनाच्या पार्श्व्भूमीवर रस्त्यावर पडलेले सर्व खड्डे त्वरित बुजविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले .
ब्रिमस्ट्रॉवेडची ८४ टक्के कामे पूर्ण -
ब्रिमस्ट्रॉवेडची ८४ टक्के कामे पूर्ण -
२६ जुलै २००५ जलप्रलयानंतर ब्रिमस्ट्रॉवेडच्या माध्यमातुन केंद्र सरकारने दिलेल्या १२०० कोटीतून करण्यात येणारी ८४ टक्के कामे पूर्ण झाली असल्याचे आयुक्तांनी सांगितले . एकूण आठ पम्पिंग स्टेशनपैकी सहा पम्पिंग स्टेशन कार्यरत असून मोगरा आणि माहुल पम्पिंग स्टेशन बनविणे बाकी आहे , ब्रिमस्ट्रॉवेडची मर्यादाही ५० मी मी पावसाची असून यापेक्षा अधिक पाऊस पडण्यास पालिकेवर त्याचा ताण पडतो असे आयुक्तांनी स्पष्ट केले .
मुंबईकरांसाठी बेस्ट आली धावून -
मुंबईकरांसाठी बेस्ट आली धावून -
मुंबईत एकीकडे रेल्वे व्यवस्था कोलमडून पडली असताना बेस्टने मुंबईकरांसाठी ३१४६ बसेस चालवून सुमारे ३० लाख प्रवाशाना रेल्वे स्टेशनवरून इच्छित स्थळी पोहोचवण्याची मुख्य जबाबदारी पार पडली , आजही बेस्ट मार्फत सी एस टी वरून ठाण्यासाठी १२ , वाशीला ७ , तर दादर घाटकोपरसाठी ९ अतिरिक्त बसेस चालवून अडकलेल्याना दिलासा दिला . आज बेस्ट ने एकूण २९९६ फेऱ्यांपैकी २३२३ बसफेऱ्या चालवून मुंबईकरांना दिलासा दिला .