सिद्धी साई कोसळण्यास शितपचा बेजबाबदारपणा कारणीभूत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 August 2017

सिद्धी साई कोसळण्यास शितपचा बेजबाबदारपणा कारणीभूत


पालिकेच्या अधिका-य़ांचीही चौकशी
घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी अहवाल सादर
मुंबई । प्रतिनिधी
घाटकोपर येथील सिध्दी साई इमारत कोसळून १७ जण ठार तर १५ जखमी झाले होते. हि दुर्घटना इमारतीचे पिलर तोडल्यामुळेच झाली असून सुनील शितपचा बेजबाबदारपणा याला कारणीभूत ठरला असल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून नमूद करण्यात आले आहे. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आले नव्हते. शिवाय बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बांधकामाची तक्रार करू नये म्हणून संबंधिताने इमारतीमधील रहिवाशांना धमकी दिल्याचेही चौकशी अहवालात म्हटले आहे.

घाटकोपर दामोदर पार्क येथील साई सिध्दी इमारत २५ जुलै २०१७ रोजी कोसऴून घडलेल्या दुर्घटनेत १७ रहिवाशांचा बळी गेला. या घटनेबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त चंद्रशेखर चोरे आणि अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे संचालक विनोद चिठोरे यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने बुधवारी महापालिका आयुक्तांकडे आहवाल सादर केला असून आयुक्तांनी हा अहवाल स्वीकारला आहे. अहवालात इमारतीचे पिलर तोडल्यामुळेच कोसऴली आणि सुनील शितपचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे.

शितपची घाटकोपरच्या एन विभागाच्या व विक्रोळी, पवई ते भांडुपच्या एस विभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असल्याचे अहवालात म्हटले आहे. या अनधिकृत बांधकामावर कायद्यानुसार तात्काळ कारवाई करा असा आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी दिला आहे. याप्रकरणी एन वॉर्डमधील कार्यकारी अभियंता व सहायक अभियंता तसेच स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांनीही कर्तव्यात कसूर केल्याने त्य़ांची पुन्हा विभागनिहाय़ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहे. अहवालातील शिफारशींची येत्या ६ महिन्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.

या दुर्घटनेप्रकरणी ‘एन' विभागाचे तत्कालिन वैद्यकीय आरोग्य अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांचा या घटनेशी थेट संबंध नाही. मात्र सदर इमारतीसंबंधी त्यांनी आपली कर्तव्ये योग्यप्रकारे पार पाडली अथवा नाही याची स्वतंत्र चौकशी होणार आहे. शिवाय ‘एन' विभागाचे तत्कालिन कार्यकारी अभियंता, इमारत व कारखाने खात्याचे सहाय्यक अभियंता आणि संबंधित कर्मचारी यांनी सदर इमारतीतील अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले नाही. मात्र संबंधित अधिकार्‍यांनी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली आहे का याची पुन्हा स्वतंत्र चौकशी होणार आहे.

शितपची अनधिकृत बांधकामे तात्काळ तोडण्याचे आदेश -
दुर्घटना प्रकरणी आरोपी असलेले सुनिल शितप याची अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर संबंधितांवर शिस्त भंगाची कार्यवाही करावी तसेच त्य़ाची अनधिकृत बांधकामे तात्काळ तोडून कठोर कारवाई करावी असे आदेश महापालिका आयुक्तांनी सदर अहवाल स्वीकारताना निर्देश दिले आहेत.

चौकशी समितीचा अहवाल --
... तळमजल्यावरील पिलर व बिम काँक्रिट आवरण मोठ्या प्रमाणात हटवल्यामुळे इमारत अत्यंत असुरक्षित  झाली होती.
... सदर काम करताना स्ट्रक्चरल ऑडीटर / सल्लागार यांची नेमणूक न करता अत्यंत घिसडघाईने काम करण्यात आले.
... इमारतीमध्ये अशास्त्रीय पद्धतीने केलेल्या चुकीच्या बांधकामामुळे दुर्घटना घडली.
... तळमजल्यावर बेकायदेशीरपणे काम करणार्‍या व्यक्तीने दिलेल्या धमक्यांमुळे रहिवाशांनी पोलीस किंवा महापालिकेकडे कधीही तक्रार दाखल केली नाही.
... यामुळे या इमारत दुर्घटनेतील जीवितहानी, वित्तहानीस सुनील शितप हाच जबाबदार आहे. त्यामुळे त्याच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी.

Post Bottom Ad