वंदे मातरम वरून पालिका सभागृहात हंगामा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 August 2017

वंदे मातरम वरून पालिका सभागृहात हंगामा


मुंबईतील शाळांमध्ये आठवड्यातून दोनदा "वंदे मातरम" -
समाजवादी, एमआयएम व मुस्लिम नगरसेवकांचा सभात्याग -

मुंबई / प्रतिनिधी -
राज्यातील विधिमंडळात "वंदे मातरम" हे राष्ट्रीय गीतावरून गोंधळ झाला होता. याच गोंधळा दरम्यान मुंबईतील शाळांमध्येही "वंदे मातरम" हे राष्ट्रीय गीत सक्तीने म्हणावे अशी ठरावाची सूचना भाजपाच्या नागरसेवकाने पालिका सभागृहात मांडली होती. या ठरावाच्या सूचनेला मुस्लिम समाजातील नगरसेवकांनी विरोध केला मात्र या विरोधाकडे दुर्लक्ष करत महापौरांनी हि ठरावाची सूचना मंजूर केल्याने समाजवादी पक्ष, एमआयएम, काँग्रेसचे नगरसेवक सुफीयांन वणू यांनी सभात्याग केला. दरम्यान हि ठरावाची सूचना आता पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवली जाणार आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या सर्व शाळा आणि मुंबई महानगर पालीकेच्या हद्दीतील सर्व अनुदानित शाळांमध्ये सोमवारी व शुक्रवारी "वंदे मातरम" हे राष्ट्रीय गीत सक्तीने म्हणावे अशी मागणी भाजपाचे नगरसेवक संदिप पटेल यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. देशप्रेम, देशभक्ती जागृत करणारे जन गण मन या राष्ट्रगीता प्रमाणे "वंदे मातरम"लाही भारतीयांच्या मनात अढळ स्थान आहे. तरुणांमध्ये आणि प्रत्येक भारतीयांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत करण्यात राष्ट्रगीताचा हातभार लागतो. त्यामुळे मुंबईतील शाळांमध्ये आठवड्यातून दोनदा "वंदे मातरम" सक्तीने म्हणावे अशी मागणी संदीप पटेल यांनी केली. यासाठी चेन्नई उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयामध्ये आठवड्यातून एकदा सोमवारी किंवा शुक्रवारी वंदे मातरम म्हणावे असा आदेश दिला असल्याचा दाखला पटेल यांनी दिला होता. सदर ठरावाची सूचना पालिका सभागृहात आज मंजुरीसाठी आली होती. ठरावाची सूचना पटेल वाचत असतानाच समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी यावर बोलायला परवानगी देण्याची मागणी केली. मात्र महापौरांनी शेख यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने समाजवादी पक्षासह विरोधी पक्षातील मुस्लिम नगरसेवकांनी सुचनेवर मतदानाची मागणी केली. महापौरांनी बोलायच्या मागणी प्रमाणेच मतदानाची मागणी धुडकावून लावत ठरावाची सूचना मंजूर केली. यामुळे महापौरांच्या या प्रकाराचा निषेध करत समाजवादी पक्षाच्या सहा, एमआयएमच्या एक व काँग्रेसच्या नियाज वणू यांनी सभात्याग केला.

दरम्यान या आधीही १९९८ साली शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक पराग चव्हाण यांनी "वंदे मातरम" पालिका शाळांमधून सक्तीचे करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या ठरावाच्या सूचनेवर अभिप्राय देताना भारतीय राज्य घटनेने दिलेल्या धर्म स्वातंत्र्याविरुद्ध असल्याने अशी सक्ती करता येणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यावेळीही वंदे मातरम ऐच्छिक असल्याचा अभिप्राय तत्कालीन आयुक्तांनी दिला आहे. त्यानंतर भाजपच्या नगरसेविका समिता कांबळे यांनीही सूर्य नमस्कार पालिका शाळांमधून सक्तीचे करण्याची ठरावाची सूचना मांडली असता त्यालाही मनसेसह विरोधी पक्षांनी विरोध केला होता. या ठरावाच्या सुचनेवरही आयुक्तांकडून अद्याप अभिप्राय देण्यात आलेला नाही. त्यानंतर आता पुन्हा भाजपाकडून "वंदे मातरम" ची सक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. या ठरावाच्या सूचनेवरही आयुक्त आधी प्रमाणेच सक्तीचे करता येत नसल्याचा अभिप्राय देणार असल्याने विरोधी पक्षांनी गप्प बसण्याचा निर्णय घेतला होता.

स्वातंत्र सैनिकही "वंदे मातरम" बोलत होते - 
देश स्वतंत्र होण्यापूर्वी सर्व धर्मीय स्वातंत्र सैनिक वंदे मातरम बोलत होते. अनेकांनी वंदे मातरम बोलत छातीवर गोळ्या खात बलिदान दिले आहे. ए आर रहेमान सारख्या संगीतकारानेही वंदे मातरम हे गाणे गायले आहे. मग इतरांना त्याचा त्रास काय ? त्यांना वंदे मातरम बोलायचे नसेल तर पालिका सभागृहामध्ये वंदे मातरम बोलताना मुस्लिम सदस्य उभे राहतात. तसेच शाळेमध्येही मुस्लिम विद्यार्थी उभे राहू शकतात.
मनोज कोटक - गटनेते भाजपा

Post Bottom Ad