मुंबई, दि. १५ - मुंबई शहराची एक वेगळी ओळख आहे. पर्यटनासाठी मुंबई जगाचे आकर्षण ठरेल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रोजेक्शन मॅपिंग प्रणालीद्वारे इतिहास आकर्षकपणे दाखविण्यात आला आहे. आपला इतिहास समृद्ध आहे. हा कमी वेळात प्रोजेक्शन मॅपिंगद्वारे सादर केला आहे. हा कार्यक्रम १५ दिवस मुंबईकरांसाठी दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर या कार्यक्रमाबाबत लोकांचे मत/प्रतिक्रिया आपले सरकार वेब पोर्टलवर घेऊन त्यानुसार आवश्यक बदल करण्यात येतील. गेट ऑफ इंडिया या ठिकाणाची एक वेगळी ओळख असल्याने याठिकाणी सादर झालेल्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे
या प्रणालीसाठी हिंदी भाषेसाठी आवाज दिलेल्या सुप्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन व मराठीसाठी आवाज दिलेले प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांचेही मुख्यमंत्री यांनी विशेष आभार मानले. मुंबईत येत्या २१ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या जागतिक स्तरावरील व्यापार मेळावा व व्हीजिट महाराष्ट्र- व्हीजिट मुंबई यासाठीच्या बोधचिन्हाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
प्रास्ताविक माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही.के. गौतम यांनी केले. त्यांनी प्रोजेक्शन मॅपिंग प्रणालीची माहिती दिली. हा कार्यक्रम पुढील १५ दिवस सायंकाळी ८ ते ९ या कालावधीत गेट वे ऑफ इंडिया येथे सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.