मुंबई - दादरला जाणाऱ्या लोकलची उद्घोषणा झाली. खांद्याला लटकवलेली झोळी, हातातील पांढरी काठी सांभाळ त्यांनी रेल्वे पकडली. यातील काही बाहेरचे जग पाहू न शकणारे तर काही हातापायाने अधू पण चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे हास्य तरळणारे दिव्यांग आपल्या कलेच्या साहित्यासह मुंबईच्या दिशेने निघालेले...त्यांना गणेशोत्सव कार्यक्रमात कला सादर करण्याचे खास निमंत्रण होते. त्यादृष्टीने कार्यक्रमाच्या रूपरेषेची आखणी सुरु झाली. मात्र धो-धो कोसळणाऱ्या पावसाने मात्र त्यावर क्षणातच पाणी फेरले. तब्बल १२ तास अडकून पडलेल्या या कलाकारांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर आणल्याने त्यांना हायसे वाटले. मात्र तरीही बासरी, ढोलकी आणि आपल्या आवाजाच्या सुरांनी लोकांना मंत्र मुग्ध करता आले नाही, याची खंत या कलाकारानी व्यक्त केली.
धीरज गिरी, विमल सबाई, गोविंद ठाकूर, सुभाष सावंत, आशा ताई कुरणे, सुरेश कुरणे आदी दिव्यांग मंडळी परळ येथील एका चर्चमध्ये वाद्यवृंद कार्यक्रमासाठी निघाले होते. सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाल्याने नियोजित वेळेत कार्यक्रम स्थळी पोहचता यावे, या हेतूने सर्वांनी सकाळी ११ वाजता डोंबिवली येथून परळच्या दिशेने निघालेली रेल्वे पकडली. जस जशी रेल्वे पुढे येत होती तस तसा पावसाचा जोर वाढत होता. दुपारी सुमारे १च्या सुमारास सायन आणि कुर्ला स्थानकाच्या मध्यभागी पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. मुसळधार पाऊस, पाण्याची वाढू लागलेली पातळी आणि वेळेत कार्यक्रम सुरू होईल की नाही, याबाबत मनात सुरू झालेली घालमेल त्यांना अस्वस्थ करू लागली. त्यात अंधार पडू लागल्याने त्यांची भीतीने गाळण उडाली. २६ जुलैच्या आठवणी गाठीशी असल्याने सुखरूप बाहेर पडू की नाही, या चिंतेनेही त्यांना ग्रासले. महिलांना रडू कोसळले. यावेळी मदतीच्या हाका मारू लागले. त्याच रेल्वेत काही पत्रकार होते. त्यांनी तात्काळ त्यांच्या मदतीकरिता सूत्र हलवले. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांना बाहेर काढले. यावेळी पावसाचा जोर ही काहीसा कमी झाला होता. यामुळे एकामागोमाग एक असे रांगेने त्यांनी खांद्याचा आधार घेत रस्ता मापण्यास सुरुवात केली. मध्यरात्री २ च्या सुमारास सायन स्टेशन गाठले आणि सुटकेचा निश्वास सोडला. मात्र कार्यक्रम पूर्ण करता न आल्याने त्यांचा हिरमोड झाला होता.