मुंबई, दि. ३: अहमदनगर जिल्ह्यात भारत राखीव पोलीस गटाच्या केंद्राच्या स्थापनेसाठी प्रशासकीय मान्यता तसेच यासाठीच्या भरती व इतर सुविधांसाठीच्या निधीसाठी तातडीने पाठपुरावा करावा, असे निर्देश जलसंधारण, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.
अहमदनगरमध्ये भारत राखीव पोलीस गटाच्या केंद्र उभारणीसंदर्भात प्रा. शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभय महाजन, राज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई, सहायक पोलीस महानिरीक्षक दिपाली मासिरकर, अपर जिल्हाधिकारी बी. एच. पालवे, उपअधीक्षक अरुण जगताप आदी उपस्थित होते. जिल्ह्यात भारत राखीव पोलीस दलाचे केंद्र लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, असे निर्देश प्रा. शिंदे यांनी दिले.