उद्धव ठाकरे यांच्या तोंडी आश्वासनावर बेस्टचा संप मिटला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 August 2017

उद्धव ठाकरे यांच्या तोंडी आश्वासनावर बेस्टचा संप मिटला


लेखी आश्वासनावर अडलेले युनियन नेते नरमले -
बेस्ट कर्मचाऱ्यांची व पगाराची जबाबदारी पालिका घेणार - उद्धव ठाकरे

मुंबई / प्रतिनिधी -
बेस्टच्या वर्धापनदिनी पुकारण्यात आलेला संप शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मध्यस्थी नंतर तब्बल १६ तासांनी मागे घेण्यात आला. बेस्ट कर्मचाऱ्यांची व बेस्ट कर्मचाऱ्यांना महिन्याच्या १० तारखेपर्यंत पगार देण्याची जबाबदारी पालिका घेईल या आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला आहे. संपामुळे मुंबईकर जनतेचे जे हाल झाले त्याबाबद्दल उद्धव ठाकरे यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. दरम्यान आयुक्तांकडून लेखी आश्वासन मागणाऱ्या युनियन नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या तोंडी आश्वासनानंतर संप मागे घेतल्याने युनियन व कृती समितीने संप करून नागरिकांना वेठीस का धरले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यात मुंबई महापालिका व राज्य सरकार अपयशी ठरल्याने कर्मचाऱ्यांच्या बेस्ट कर्मचारी कृती समितीने रविवारी (६ ऑगस्ट) मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. बेस्टने संप पुकारल्यावर रविवारी सायंकाळपासून कर्मचारी कामावर हजर न झाल्याने रविवारी रात्रीपासूनच संपाची झळ पोहचू लागली होती. सोमवारी बेस्टचे ३६ हजर कर्मचारी गैरहजर राहिल्याने सकाळी एकही बस डेपोबाहेर पडली नाही. यामुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल झाले. प्रवाश्यांना खाजगी गाड्यांनी व रिक्षा टॅक्सी मधून प्रवास करावा लागला. यावेळी रिक्षा टॅक्सी मधून पाचपट भाडे आकारले जात असल्याने प्रवाश्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप करू नये म्हणून महापौरांनी सात ते आठ बैठक घेतल्या होत्या. मुख्यमंत्र्यांकडेही रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा पगार 10 तारखेला देण्यात यावा असे आदेश आयुक्तांना दिले. त्याला आयुक्तांनी तयारी दाखवली होती. राज्य सरकारकडूनही हवी ती मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आयुक्तांवर कोणत्याही कर्मचारी युनियनचा विश्वास नसल्याने लेखी आश्वासन देण्याची मागणी करत संप पुकारण्यात आला होता. आयुक्त लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचे कर्मचारी कृती समितीकडून सांगण्यात आले होते. मात्र सोमवारी दुपारी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी संपन्न झालेल्या बैठकीत युनियन नेते शशांक राव यांनी संप मागे घेण्यात आल्याची घोषणा केली.

बेस्टचा संप होणार म्हणून खुद्द उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा बैठक घेऊनही संप करणारच अशी भूमिका युनियन नेत्यांनी घेतली होती. मात्र आज झालेल्या बैठकीदरम्यान पालिका आयुक्तांनी लेखी आश्वासन दिले नसताना युनियन नेत्यांनी संप मागे घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संप आणखी काळ चालला असता तर यात भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून क्रेडिट घेतले असते. भाजपाने क्रेडिट घेतल्यास पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची राजकीय हानी झाली असती. यामुळे शिवसेनेने संपाबाबत पुढाकार घेत युनियन नेत्यांना तोंडी आश्वासनावर संप मागे घ्यायला लावून संप मिटविण्याचे क्रेडिट घेतले असल्याची राजकीय वर्तुळात आहे.

संपाबाबतच्या मागण्या - 
बेस्ट कामगारांचा पगार महिन्याच्या दुसर्‍या दिवशी करावा
बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा
महापालिकेने बेस्टला दिलेले कर्ज अनुदान जाहीर करावे
पालिका आकारत असलेल्या विविध करातून सूट मिळावी
बेस्ट उपक्रमाची सर्व जबाबदारी पालिकेने घ्यावी

बेस्टला संपामुळे ३ कोटींचे नुकसान -
बेस्टने पुकारलेल्या संपामुळे दिवसाला अडीच ते ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बेस्टच्या ३२८० बसेस रोज रस्त्यावर धावतात. यामधून २९ ते ३० लाख प्रवाशी प्रवास करतात. या प्रवाश्यांच्या माध्यमातून बेस्टला दिवसाला अडीच ते ३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. सोमवारी एकही बस रस्त्यावर धावली नसल्याने बेस्टला या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. आधीच बेस्ट आर्थिक तोट्यात असताना बेस्टला या उत्पन्नावर पाणी सोडावे लागल्याने बेस्टच्या नुकसानीत आणखी भर पडली आहे. बेस्टला रोज २.५० कोटी रुपयांचा तोटा आहे, वर्षाला हा तोटा ९०० कोटी रुपयांचा असून सन २०१० पासून अद्याप बेस्टचा संचित तोटा २५०० कोटी रुपये आहे.

बेस्ट संपादरम्यान एसटीच्या जादा गाड्या -
बेस्टच्या संपादरम्यान प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने पनवेल येथून 44, ठाणे येथून 25, तर मुंबई येथें 34 बस गाड्यांची व्यवस्था केली होती. प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून परिवहन आयुक्तांनी खाजगी बस व मालवाहतूक गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी दिली होती. यामुळे प्रवाश्याना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र परिवहन आयुक्तांनी जास्तीत जास्त रिक्षा आणि टॅक्सी रस्त्यावर उतरवण्यास सांगितले. त्याचा चांगलंच फायदा रिक्षा टॅक्सी चालकांकडून घेण्यात आला. रिक्षा टॅक्सीकडून प्रवाश्याना दिलासा मिळण्याऐवजी पाचपट भाडे आकारून प्रवाश्यांची लूटमार केली जात असल्याची तक्रार प्रवाश्यांनी केली आहे.

पगार वेळेत मिळेल -
सर्वजण महागाईने बेजार झाले असताना ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांना असलेला पगारही वेळेत मिळत नसल्याने त्यांच्यावर संपावर जाण्याची वेळ आली. मात्र त्यांचा पगार वेळेत मिळेल असा शब्द मी देतो. त्यांच्या इतर मागण्याही रास्त असून त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

पगार वेळेत मिळतील याची खात्री -
गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचार्‍यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला असून २० तारीखपर्यंत पगार होत आहेत. मात्र ‘बेस्ट’ला आर्थिक मदत करण्यास टाळाटाळ करीतअसल्यामुळेच संपाचे हत्यार उपसावे लागले. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे पगार वेळेत मिळतील याची खात्री मिळाल्यामुळेच संप मागे घेतला.
- सुहास सामंत, कृती समिती

ग्वाही दिल्यामुळेच संप मागे -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांपासून कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवून संप टाळण्याचे प्रयत्न करण्यात आले. कर्मचार्‍यांचे पगार वेळेत होतील आणि इतर मागण्याही टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील याची ग्वाही खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यामुळेच संप मागे घेतला.
- शशांक राव, कृती समिती

मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील -
मुंबईकरांसाठी रेल्वेनंतर ‘बेस्ट’ हे महत्त्वाचे परिवहनाचे साधन आहे. त्यामुळे ‘बेस्ट’वाचलीच पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे आगामी काळात कर्मचार्‍यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ‘बेस्ट’ची आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- अनिल कोकीळ, अध्यक्ष, ‘बेस्ट’ समिती

Post Bottom Ad