बेस्टच्या वर्धापन दिनी (७ ऑगस्टपासून) कर्मचार्‍यांचा संप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 August 2017

बेस्टच्या वर्धापन दिनी (७ ऑगस्टपासून) कर्मचार्‍यांचा संप


रक्षाबंधनाच्या दिवशी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार -
मुंबई / प्रतिनिधी -
बेस्टला महापालिकेने आर्थिक मदत करावे, बेस्टलामहापालिकेत सामावून घ्यावे या मागण्यांसाठी वडाळा डेपोबाहेर मंगळवारी साखळी उपोषण सुरु केले. या उपोषणाकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. उपोषण मागे घेताना ६ ऑगस्ट पर्यंत पालिकेकडून काही दिलासा मिळणार आहे का हे पाहून ६ तारखेच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून संप पुकारण्यात येणार आहे अशी माहिती बेस्ट कामगार कृती समितीचे सुहास सामंत यांनी दिली आहे. विशेष म्हणजे ७ ऑगस्ट हा बेस्टचा ७० वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनी व रक्षाबंधन या सणाच्या दिवशीच बेस्टचा संप होणार आहे. यामुळे मुंबईकर नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

बेस्ट कामगारांचा पगार महिन्याच्या दुसर्‍या दिवशी करावा, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, महापालिकेने बेस्टला दिलेले कर्ज अनुदान जाहीर करावे, पालिका आकारत असलेल्या विविध करातून सूट मिळावी, बेस्ट उपक्रमाची सर्व जबाबदारी पालिकेने घ्यावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्टच्या १२ युनियनच्या कृती समितीने मंगळवार पासून उपोषण सुरु केले होते. यावेळी युनियन प्रतिनिधींनी उपोषण सुरु केले तर बेस्ट कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरु केले. तीन दिवस उपोषण सुरु असले तरी महापालिका किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने संपकर्‍यांची भेट घेतलेली नाही. याच दरम्यान उपोषणकर्त्यां युनियन पदाधिकाऱ्यांची प्रकृती खालावत चालल्याने आज गुरुवारी हे उपोषण मागे घेण्यात आले. आज महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार सुनील शिंदे, अजय चौधरी, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. मात्र कोणत्याही प्रकारचे ठोस आश्वासन दिलेले नाही.

आपल्या न्याय्य हक्कांसाठी कामगार शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत. मात्र प्रशासनाचे कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे असेच दुर्लक्ष केले तर आंदोलन तीव्र होईल. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय झाला नाही तर ७ ऑगस्टपासून ‘बेस्ट’ कर्मचारी संपावर जातील. याची संपूर्ण जबाबदारी आयुक्त आणि सरकारची असेल असा इशारा कृती समितीचे सदस्य व बेस्ट कामगार सेनेचे नेते सुहास सामंत यांनी दिला आहे. कृती समितीने संप करण्यासाठी घेतलेल्या मतदानात ९७ टक्के कौल मिळाला. तरीही संप न करता सदनशीर मार्गाने साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. मात्र शासकीय यंत्रणांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे कामगारांच्या सहनशीलतेचा अंत झाला. त्यामुळेच कामगार-कार्यकर्त्यांच्या सभेत झालेल्या निर्णयानुसार ६ ऑगस्टपर्यंत प्रश्न सुटला नाही तर बेमुदत संप करण्यात येईल असा इशारा बेस्ट वर्कर्स युनियन व कृती समितीचे शशांक राव यांनीही दिला आहे. दरम्यान पालिका प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास ७ ऑगस्ट रोजी होणार्‍या संपामध्ये ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांच्या बेस्ट कामगार सेना, बेस्ट वर्कस युनियन, बेस्ट कामगार संघटना, भाजप बेस्ट कामगार संघ, बेस्ट कामगार युनियन, बेस्ट एम्प्लॉइज युनियन, बेस्ट परिवहन कर्मचारी संघ, बेस्ट जागृत कामगार संघटनांसह अनेक संघटना सहभागी होणार आहेत.

Post Bottom Ad