मुंबई / प्रतिनिधी -
बेस्टला महापालिकेने आर्थिक मदत करावे, बेस्टलामहापालिकेत सामावून घ्यावे या मागण्यांसाठी वडाळा डेपोबाहेर साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणाकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. उपोषणाच्याि दुसऱ्या दिवशीही महापालिका किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने संपकर्यांची भेट घेऊन विचारपूसही केली नाही. यामुळे कर्मचार्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून दोन दिवसांत तोडगा न काढल्यास येत्या ७ ऑगस्टपासून बेस्ट कर्मचारी संपावर जातील असा इशारा कर्मचारी कृती समितीने दिला आहे.
‘बेस्ट’ हा महापालिकेचाच उपक्रम आहे. त्यामुळे ‘बेस्ट’ला आर्थिक सहाय्य करण्याची जबाबदारी महापालिका टाळू शकत नाही असे सांगत कृती समितीने वडाळा बेस्ट डेपोसमोर १ ऑगस्टपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. मात्र आज संपाच्या दुसर्या दिवशी प्रशासनाचा कोणताही अधिकारी उपोषणस्थळी फिरकला नाही. वेळेत पगार मिळावा, महापालिकेने आर्थिक सहाय्य करावे या आपल्या हक्कांसाठी ‘बेस्ट’चे कर्मचारी लढत असताना प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप बेस्ट कामगार सेना आणि कृती समितीचे सुहास सामंत यांनी केला आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी कामगार शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत. मात्र प्रशासनाचे कर्मचार्यांच्या मागण्यांकडे असेच दुर्लक्ष केले तर आंदोलन तीव्र होईल. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय झाला नाही तर ७ ऑगस्टपासून ‘बेस्ट’ कर्मचारी संपावर जातील. याची संपूर्ण जबाबदारी आयुक्त आणि सरकारची असेल असा इशारा कृती समितीचे सदस्य व बेस्ट कामगार सेनेचे नेते सुहास सामंत यांनी दिला आहे.