मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईच्या महापौरांनी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून गेले १० वर्षे महापौर बंगल्याच्या परिसरात कृत्रिम तलाव उभारण्यात येत होता. गेल्या १० वर्षात गणेशभक्तांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती झाल्याने कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र यावर्षी महापौर बंगल्या परिसरात उभारण्यात आलेला कृत्रिम तलाव उभारण्यात आला नसल्याने दरवर्षी या तलावात गणेश विसर्जन करणाऱ्या अनेकांची गैरसोय झाली होती.
श्री गणेशाच्या बहुतेक मुर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात. या मुर्त्या समुद्रात तलावात विसर्जन केल्याने त्यामधील पाणी प्रदूषित होऊन पाण्यातील जीवांना त्यापासून धोका निर्माण होतो. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचा मुद्दा पुढे आल्याने २००७ मध्ये तत्कालीन महापौर शुभा राऊळ यांनी महापौर बंगल्याच्या परिसरात कृत्रिम तलाव उभारून श्री गणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. गेले १० वर्षे मुंबईच्या महापौर पदी विराजमान झालेल्या सर्वच महापौरांनी दरवर्षी महापौर बंगल्याच्या परिसरात कृत्रिम तलाव उभारून नागरिकांना पर्यावरण रक्षणाचा चांगला संदेश दिला होता.
याला मात्र सध्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे अपवाद ठरले आहेत. महापौरांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कृत्रिम तलावात श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन केल्याने सालाबाद प्रमाणे शेकडो लोक महापौर बंगल्यातील कृत्रिम तलावाकडे येत होते. मात्र त्यांना बाजूच्या क्रीडा भवनाच्या जागेवर उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावाकडे पाठवण्यात येत होते. यामुळे गणेश विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या लोकांची गैरसोय होत होती. याबाबत अधिक माहिती घेतली असता महापौरांच्या सूचनेनुसार सुरक्षेच्या कारणास्तव कृत्रिम तलाव बाजूच्या क्रीडा भवनाच्या जागेत हलवावे लागल्याची माहिती पालिकेकडून उपलब्ध झाली आहे.
महापौरांच्या सूचनेनुसार सुरक्षेच्या कारणास्तव कृत्रिम तलाव हलवले -
महापौर निवासाच्या जागेतील कृत्रिम तलाव हे क्रीडा भवनाच्या जागेत हलवण्यात आले आहे. जी-उत्तर विभागात मागील वर्षी ९ कृत्रिम तलाव होते, याही वर्षी तेवढेच आहेत. केवळ महापौर निवासस्थानाच्या जागेतील कृत्रिम तलाव हे महापौरांच्या सूचनेनुसार सुरक्षेच्या कारणास्तव हलवावे लागले.
- रमाकांत बिरादर, सहायक आयुक्त जी-उत्तर