बाबासाहेबांचे वास्तव्य लाभलेल्या स्थळांचा विकास गतिमान करावा - जयकुमार रावल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 August 2017

बाबासाहेबांचे वास्तव्य लाभलेल्या स्थळांचा विकास गतिमान करावा - जयकुमार रावल


मुंबई, दि. 10 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या किंवा त्यांच्याशी संबंधित स्थळांना पर्यटनस्थळांचा दर्जा देणे व या स्थळांचा विकास करण्यासंदर्भातील कार्यवाही गतिमान पद्धतीने राबवावी, असे निर्देश पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त घोषित स्थळांचा विकास करण्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी सामाजिक न्याय विभाग, पर्यटन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची एकत्रित बैठक पार पडली, त्‍यावेळी ते बोलत होते.

मंत्रालयात आयोजित बैठकीत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, आमदार गौतम चाबुकस्वार, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे आदी उपस्थित होते. राज्यभरातील लेण्यांचा विकास करून पर्यटकांची संख्या वाढविण्यासंदर्भात राज्यभरातील लेणी तज्ञांची लवकरच बैठक बोलविण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर विकास कामे तातडीने राबविण्यात येतील अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. लेण्यांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासंदर्भात मंत्रालयीन दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी बोलताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांचे वास्तव्य लाभलेल्या किंवा त्यांच्याशी निगडीत अशा पाच स्थळांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचतीर्थ म्हणून घोषित केले होते. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव महू, लंडन येथील निवासस्थान, नागपूर येथील दीक्षाभूमी, नवी दिल्ली येथील महापरिनिर्वाण स्थळ, मुंबई येथील चैत्यभूमी या स्थळांचा समावेश आहे. यातील दोन स्थळे महाराष्ट्रातील असून या व्यतीरिक्त सामाजिक न्याय विभागाने निश्चित केलेल्या स्थळांचा गतिमान विकास करण्यात यावा, धुळे जिल्ह्यातील लांडोर बंगला या ठिकाणी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती. त्याचादेखील विकास करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या प्रस्तावात समावेश करावा असे निर्देश मंत्री रावल यांनी दिले.

सामाजिक न्याय विभागाकडून 28 स्थळांचा विकास आराखडा – राजकुमार बडोले
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यावेळी म्हणाले, बाबासाहेबांचे वास्तव्य लाभलेल्या किंवा त्यांच्याशी निगडीत राज्यातील 28 स्थळांचा विकास आराखडा सामाजिक न्याय विभागाने तयार केला आहे. या स्थळांवर विविध विकास कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीही देण्यात आला आहे. संबधित सर्व विभागांनी मिळून कार्यवाही गतिमान करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या स्थळांच्या विकास कामासाठी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. कार्यवाही गतिमानतेने राबविण्यासंदर्भात ही समिती काम करणार आहे.

Post Bottom Ad