वसई, विरार, भाईंदर स्थानकात मोफत वायफाय सेवा सुरू -
मुंबई / प्रतिनिधी - पनवेल ते मुंबई सीएसएमटी आणि विरार ते वांद्रे एलिव्हेटेड फास्ट कॉरिडॉर प्रकल्पांच्या उभारणीकरिता निधी मिळावा यासाठी आशियाई विकास बँक आणि जागतिक बँकांशी बोलणी प्रगतिपथावर सुरू असून लवकरच हे प्रकल्प मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी वांद्रे येथील पश्चिम रेल्वे अधिकारी विश्रामगृह येथे आयोजित एका कार्यक्रमात दिली.
वांद्रे टर्मिनस-गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस, वांद्रे -पाटणा हमसफर एक्सप्रेसचा शुभारंभ, बोरिवली स्थानकातील लिफ्टस्, वसई रोड-विरार, भाईंदर स्थानकातील वायफाय सुविधांचे उद्घाटन वांद्रे येथील पश्चिम रेल्वे अधिकारी विश्रामगृह येथून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अमळनेर-होळ आणि चिंचपाडा-नंदुरबारदरम्यानचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरणाचे लोकार्पणही प्रभू यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशीष शेलार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुंबईतील मध्य व पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरीवली, चर्चगेट, सीएसटी, दादर, ठाणे, कल्याण या महत्वाच्या स्थानकांत रेल्वे प्रशासन, गुगल आणि रेलटेल कंपनीच्या साहाय्याने हायस्पीड वायफाय सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. केवळ एक पासवर्ड टाकून प्रवाशांना मोफत वायफायचा लाभ घेता येत आहे. आता पश्चिम रेल्वे प्रशासनाने वसई, विरार आणि भाईंदर रेल्वे स्थानकांतील प्रवाशांना देखील मोफत वायफाय उपलब्ध करून दिली आहे.
रविवारी पश्चिम रेल्वेवरील तीन स्थानकांमध्ये या सेवेचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. येत्या तीन वर्षांत देशभरातील ४०० प्रमुख रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा पुरविण्यात येणार असून या योजनेचा भाग म्हणून टप्प्याटप्याने ही सेवा मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये सुरू करण्यात येत आहे. विनामूल्य वायफायची ही सेवा २०१८ अखेरपर्यंत ४०० स्थानकांवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.