मुंबई, दि. ११ : एसटीच्या सेवेत दाखल झालेल्या वातानुकूलित आणि आरामदायी अशा शिवशाही बसची आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमासह शिवशाही बसची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी यावेळी दिली.
रावते यावेळी म्हणाले, प्रवाशांना अधिक सुखकर तसेच किफायतशीर दरात प्रवास करता यावा यासाठी तसेच खासगी वाहतुकीकडे वळलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे वळविण्यासाठी एसटी महामंडळ विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व सुविधांनीयुक्त,वातानुकूलित आणि आरामदायी अशा २ हजार शिवशाही बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. या बस मुख्यत्वे करून लांब पल्ला, मध्यम लांब पल्ला व आंतरराज्य मार्गावर चालविण्याचे नियोजन आहे. सध्या मुंबई-रत्नागिरी व पुणे-लातूर या मार्गावर ही बससेवा सुरु करण्यात आली आहे. इतर भागात टप्प्याटप्प्याने या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत, अशी माहिती मंत्री रावते यांनी यावेळी दिली.
या बससाठी प्रति प्रवासी प्रति किमी साधारण दीड रुपया इतका किफायतशीर दर आहे. बसमध्ये प्रत्येक प्रवाशास स्वतंत्र मोबाईल चार्जर, सीट बेल्ट, पुशबॅक पद्धतीच्या सीटस, दोन एलसीडी टीव्ही अशा सुविधा आहेत. पूर्ण वातानुकूलित आणि आरामदायी असलेली शिवशाही बस प्रवाशांच्या निश्चितच पसंतीस उतरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.