एसआरए, कलेक्टर, म्हाडा कार्यालयातील अधिकाऱ्यांची चौकशी करा -
पत्रकार परिषदेत विरोधकांची निदर्शने -मुंबई / प्रतिनिधी -
विक्रोळी पार्क साईट येथील हनुमान नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संदीप येवले यांनी २३ दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन येवले यांनी ६० लाख रुपये आंदोलन आणि भ्रष्टाचार उघड करण्यासाठी खर्च केल्याचा दावा केला आहे, उरलेले ४० लाख रुपये मुख्यमंत्री, लाच लुचपत विभाग किंवा इडी सारख्या यंत्रणा आपल्या ताब्यात घेत नसल्याने हि रक्कम आदिवासी कल्याण किंवा अपंग कल्याणावर कराच करण्याची परवानगी शासनाने द्यावी अशी मागणी येवले यांनी केली आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत येवले यांनी हनुमान नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत सहभागी असलेल्या एसआरए, कलेक्टर, म्हाडा मधील अधिकाऱ्यांची तसेच स्थानिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी लाच लुचपत विभागाकडून करावी, या अधिकाऱ्यांविरोधात ४२० कलमान्वये एफआयआर दाखल करावा तसेच सर्वांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी करावी अशी मागणी येवले यांनी केली. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश व कार्यकर्त्याची कमिटी नेमण्याचीही मागणी येवले यांनी केली आहे.
याच वेळी २९ मार्च २०१७ ला १ कोटी रुपये ओमकार बिल्डरकडून भेटले हे पैसे गेल्या चार वर्षात उप जिल्हाधिकारी, एसआरए, हाय पॉवर कमिटी समोर आव्हान देण्यासाठी, गेल्या चार वर्षात घेण्यात आलेल्या सभा, प्रिंटिंग, पुरावे गोळा करणे, आरटीआय मधून माहिती गोळा करण्यात खर्च केल्याचा दावा येवले यांनी केला आहे. मी गोळा केलेले पुरावे बाहेर काढू नये या प्रकरणात शांत बसावे म्हणूनच बिल्डरने मला ११ कोटी रुपयांची ऑफर दिली होती. त्यापैकी एक कोटी रुपये मला दिल्याचा पुनरुच्चार येवले यांनी केला. मी भ्रष्टाचार सिद्ध केला असला तरी अद्याप कारवाई होत नसल्याने सरकार आणि पोलिसांपेक्षा बिल्डरचे हात लांब असल्याचा टोला येवले यांनी लगावला.
येवले यांच्या पत्रकार परिषदेत काही रहिवाश्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पैसे खाल्याचा आरोप केला आहे यावर बोलताना लोकशाहीत सर्वाना आपले मत मांडण्याचा, निदर्शने करण्याचा अधिकार आहे. जे कोणी माझ्या विरोधात आंदोलन कारण्यास इथे आले आहेत ती सर्व माणसे सुधीर मोरे व संदीप पडवळ यांची आहेत. त्यांना पैसे देऊन निदर्शने करण्यास सांगण्यात आले आहे. निदर्शने करणाऱ्यामधील काही लोक चांगली असून त्यांना फसवून येथे पाठवण्यात आल्याचे येवले यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत निदर्शने -
येवले यांच्या पत्रकार परिषदे दरम्यान काही स्थानिक रहिवाश्यांनी पत्रकार परिषद सुरू असताना १०० एक कार्यकर्त्यानी पत्रकार संघात घुसून निदर्शने करण्याचा व येवले यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. या निदर्शनकर्त्यांना पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांच्या नेतृत्वा खाली येवले यांची भेटही घालून देण्यात आली. मात्र या आंदोलन कर्त्यांनी बिल्डरने आमच्या भाड्यासाठी दिलेले पैसे खाल्ल्याचा आरोप केला आहे. येवले यांनी मैदानात येऊन आमच्याशी खुली चर्चा करावी असे आव्हान या निदर्शनकर्त्यांनी दिला आहे.