मुंबई - जालना जिल्ह्यातील बाबुवाडी सिंचन तलावाच्या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना प्राधान्याने तातडीने देण्याचे निर्देश जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज दिले.
विधानभवनमध्ये बाबूवाडी सिंचन तलाव (मौजे भाकरवाडी, ता. बदनापूर, जि. जालना) या प्रकल्पाच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी प्रा. शिंदे यांनी निर्देश दिले. यावेळी बदनापूरचे आमदार नारायण कुचे, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जालनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड आदी उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्पासाठी जमिनी दिलेले शेतकरी मोबदल्यावाचून प्रलंबित आहेत. या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी यासाठी प्राधान्याने कार्यवाही करावी. सिंचन तलावासाठी येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी दिल्या. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून त्याचा मोबदला देण्यात का आला नाही. याची चौकशी करावी. तसेच तातडीने त्यांना मोबदला देण्याची कार्यवाही सुरू करावी, असे निर्देशही प्रा. शिंदे यांनी यावेळी दिले.