मुंबई, दि. ११ : राजापूर तालुक्यात (जि.रत्नागिरी) असलेल्या टंचाईग्रस्त गावांना पांगरे बु. येथील धरणाचे पाणी पाईपलाईनद्वारे मिळावे यासाठी पाणीपुरवठयाचे नियोजन करावे. तसेच नाविन्यपूर्ण योजना आखाव्या, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.
राजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार राजन साळवी यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री खोत यांना निवेदन दिले होते. त्यानुसार आज राज्यमंत्री खोत यांनी सर्व मंत्रालयीन व क्षेत्रीय अधिका-यांसोबत बैठक आयोजित केली होती. बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जलसंपदा विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
राज्यमंत्री खोत यांनी सांगितले की, राजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रॅव्हीटी तंत्रज्ञानाचा वापर करावा. पंपिंगने पाणीपुरवठा करण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्रधिकरण, जिल्हा परिषद, जलसंपदा विभागाने संयुक्त सर्वेक्षण करावे. माहिनाभरात याबाबतचा आराखडा तयार करून सादर करावा, असे निर्देश खोत यांनी दिले. पांगरे बु. धरणातून आसपासच्या गावांना पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी टंचाई निधीतून निधी घेणे शक्य आहे, याबाबत १५ दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना खोत यांनी दिल्या.