वीज बचतीसाठी मध्य रेल्वेकडून सौर ऊर्जा, जम्बो फॅन आणि एलईडी दिव्यांचा वापर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 August 2017

वीज बचतीसाठी मध्य रेल्वेकडून सौर ऊर्जा, जम्बो फॅन आणि एलईडी दिव्यांचा वापर


वार्षिक १ कोटी ४ लाख रुपयांची बचत करणार -
मुंबई । प्रतिनिधी - 18 August 2017 -
मध्य रेल्वेने विजेवरील होणार खर्च कपात करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेवरील मुंबई उपनगरीय सर्व रेल्वे स्थानकांवर एलईडी दिवे बसविण्याचा व रेल्वे स्थानकात कमी विजेवर जास्त हवा देणारे जंबो फॅन लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पारंपरिक ऊर्जास्रोतांपेक्षा अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करण्यात देखील मध्य रेल्वे आघाडी घेतली आहे. मध्य रेल्वे एलईडी दिवे आणि सौरऊर्जा प्रकल्पांचा वापर करून वार्षिक १ कोटी ४ लाख रुपयांची बचत करणार आहे.

रेल्वे स्थानकात गरमीच्या दिवसात फॅन खाली उभे राहूनही हवा लागत नाही असा अनुभव सर्वच रेल्वे स्थानकात येतो. गरमीच्या दिवसात प्रवाश्यांना होणार हा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने आता आवाज न करणारे, कमी विजेवर जास्त हवा देणारे जंबो फॅन लावण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या एका जंबो फॅनची किंमत साडे तीन लाख रुपये आहे. असे ९ फॅन सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई सीएसटीएम स्थानकात लावण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकातही अश्याच प्रकारचे फॅन लावण्यात आले आहेत. यानंतर आता असेच ८ जंबो फॅन लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नव्या प्रवेशद्वारावर, कल्याणमधील बुकिंग हॉलजवळ आणि सीएसएमटी येथील मेन लाईन स्थानक आणि लांब पल्ल्याच्या मधील भागात बसवण्यात येणार आहेत. हे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने सर्व विभागांना शक्य तेथे पर्यावरणपूरक आणि विद्युतभार कमी करणारे एलईडी दिवे वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय सर्व रेल्वे स्थानकांवर एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०१८ ही डेडलाइन निश्चित केली आहे. मुंबई उपनगरीय मार्गावरील ३७ रेल्वे स्थानकांवर जुलैअखेर एलईडी दिवे लागले आहेत. उर्वरित ३९ रेल्वे स्थानकांवर लवकरच एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. या दिव्यांमुळे वार्षिक ७७ लाखांची बचत होणार आहे. सौरऊर्जेच्या वापरासाठी मध्य रेल्वेने सहा ठिकाणी सौरऊर्जा पॅनल कार्यान्वित केले आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसशेजारील अ‍ॅनेक्स इमारतीच्या छतासह, लोणावळा रेल्वे स्थानक, नेरळ, भायखळा, आसनगाव, कामन रोड या स्थानकांवर सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. मध्य रेल्वे सौरऊर्जेच्या माध्यमाने १५० केडब्ल्यूपी ऊर्जेची निर्मिती करत आहे. सौरऊर्जा प्रकल्पांमुळे मध्य रेल्वे वार्षिक २७ लाखांपर्यंत बचत करत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS