हजाराच्या पाससाठी लाख रुपये बँकेतून कापले -
मुंबई । प्रतिनिधी -
केंद्र सरकारने सुरु केलेल्या कॅशलेस पेमेंटचा एक भाग म्हणून रेल्वे प्रशासनाने बुकिंग काउंटरवर प्रवाशांसाठी ई-पेमेंटची सुविधा सुरू केली. मात्र याचा फटका पश्चिम रेल्वेवरील एका प्रवाश्याला बसला आहे. हजार रुपयाच्या रेल्वे पासच्या बदल्यात रेल्वे कर्मचाऱ्याने टाकलेल्या चुकीच्या आकड्यांमुळे प्रवाश्याच्या बँक खात्यातून लाख रुपये कापल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकार समोर आल्यावर रेल्वे प्रशासनाने संबंधित बुकिंग क्लार्कवर शिस्त भंगाची कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाने बुकिंग काउंटरवर प्रवाशांसाठी सुरु केलेल्या ई-पेमेंटच्या सुविधेनुसार विकास मंचेकर या प्रवाशाने अंधेरी-बोरीवली मार्गावर प्रथम दर्जाचा तिमाही पास बोरीवली येथे काढला. मंचेकर यांनी बुकिंग क्लार्कला आपले क्रेडिट कार्ड स्वाइप करण्यासाठी दिले. त्या वेळी बुकींग क्लार्कने १ हजार ३३० रुपये ३० पैशाऐवजी १ लाख ३३ हजार ३३० रुपये इतकी रक्कम आकारण्याचे आदेश मशिनमार्फत दिले. मंचेकर यांच्या खात्यातून एक लाखाहून अधिक रुपये डेबिट झाल्याची माहिती मिळताच मंचेकर यांनी सदर प्रकार स्टेशन मास्तरच्या निदर्शनास आणून दिला. मंचेकर यांनी त्यांच्या बँकेला फोन करून झाल्या प्रकारची माहिती दिली.
विकास मंचेकर यांनी या प्रकरणी स्टेशन मास्तरांंकडे तक्रार केली आहे. कार्डची ड्यू डेट २४ आॅगस्ट आहे. तोपर्यंत रक्कम खात्यात जमा न झाल्यास बँकेकडून ४ ते ५ हजार रुपयांचे व्याज आकारण्यात येणार आहे. असे व्याज आकारल्यास त्याची भरपाई पश्चिम रेल्वेने करावी, अशी मागणी मंचेकर यांनी केली आहे. त्याचबरोबर अशा प्रकारची चूक पुन्हा कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून होऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वेने सर्व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे मंचेकर यांनी म्हटले आहे.