मुंबई, दि.१८ - विद्यार्थ्यांना शिकाऊ वाहन परवाना मिळणे सोईस्कर व्हावे, यासाठी महाविद्यालयातच संगणक व टॅब बेस प्रणालीद्वारे हे दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संगणक व टॅब बेस प्रणालीद्वारे परवाना चाचणी घेऊन परवाने वाटप करण्याठी व ही सुविधा आपल्या महाविद्यालयात राबविण्यासाठी मुंबई मध्य या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रातील महाविद्यालयांनी कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन ताडदेव प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन चाचणी घेऊन शिकाऊ वाहन परवाना वाटप करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या इच्छुक महाविद्यालयांनी कार्यालयाकडे अर्ज करावे , असे आवाहन प्रादेशिक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
या महाविद्यालयांना संधी -
महाविद्यालयांमध्ये कॉम्प्युटर लॅब असावी, त्यात किमान १० संगणक व २ एमबीपीएस क्षमतेची इंटरनेट जोडणी तसेच प्रिंटरसह इतर सुविधा असावी, संगणक सुविधा उपलब्ध नसल्यास टॅबची सुविधा असणाऱ्या महाविद्यालयांना संधी देण्यात येणार आहे. याशिवाय महाविद्यालय किंवा शिक्षण संस्था मान्यताप्राप्त असावी, केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीच चाचणी घेण्यात येईल, महाविद्यालयाने चाचणीची व्यवस्था नि:शुल्क करावी, विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांनी तयार करावी, महाविद्यालयाने अर्जदारांचे अर्ज व कागदपत्र http://parivahan.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करावे, कागदपत्र,अर्जांची छाननी महाविद्यालयांनी करावी, असे ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.