मुंबईच्याच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या बंगल्याची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर महापौरांचे निवासस्थान कुठे होणार असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला होता. महापौरांचे नवे निवासस्थान भायखळा येथील राणीबागेतील बंगल्यात करण्याचे पालिका प्रशासनाने निश्चित केले आहे.
मुंबई महापालिकेत २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक मुंबईत उभारावे अशी मागणी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केली होती. स्मारकासाठी महापौर निवासस्थानाची मागणी पुढे आली. राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली. महापालिकेच्या सुधार समिती व सभागृहात शिवाजी पार्क येथील महापौर निवासाची जागा लवकरच 'बाळासाहेब ठाकरे स्मारक विश्वस्त मंडळा'ला द्यावी लागणार आहे.
महापौरांचे निवासस्थान स्मारकाला देण्यात येणार असल्याने महापौरांसाठी नव्या निवासस्थानाचा शोध सुरु करण्यात आला होता. महापौर निवासस्थान भायखळा राणी बागेतील बंगल्यात किंवा मलबार हिल येथील पालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांच्या बंगल्यात हलवण्याची मागणी करण्यात आली होती. राणी बागेतील निवासस्थानाला महापौरांनी व शिवसेना नेत्यांनी विरोध दर्शवला होता. सत्ताधाऱ्यांचा विरोध असला तरी आयुक्तांनी राणीबागेतील बंगला महापौरांना देण्याचे निश्चित केल्याचे समजते.
राणी बागेतील बंगल्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. बंगल्याच्या डागडुजीसाठी प्रशासनाने निविदा मागवून ६० लाखांचे कंत्राट देण्याचा निर्णयही घेतला आहे. बंगल्याची काही संरचनात्मक दुरुस्ती, तुटलेल्या लाद्या बदलणे, टॉयलेटची दुरुस्ती, आतील व बाहेरील प्लास्टरींग, रंगरंगोटी तसेच कौलारु छताच्या लाकडाची दुरुस्ती आदी कामे करण्यात येतील. यासाठी हाय टेक इंजिनीअर्स या कंत्राट कंपनीला हे कंत्राट देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बंगल्याच्या नूतनीकरणासाठी महापौर, आयुक्त, अतिरिक्त इत्यादी महत्वाच्या व्यक्तींच्या शासकीय निवासस्थानांच्या दुरुस्ती व देखभाल आदी खात्यातून पैसे खर्च करण्यात येणार आहे. पुरातन वास्तू जतन सल्लागार म्हणून स्ट्रक्टवेल डिझायनर्स व कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कामाला मुंबई वारसा वास्तू जतन समितीने मंजूरी दिली असल्याचे समजते.