मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईमध्ये होत असलेल्या मराठा क्रांती मूक मोर्च्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आल्याने बेस्टच्या बस मार्ग वळवण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. तसेच रेल्वेनेही मोर्चेकऱ्यांसाठी जास्त तिकीट खिडक्या सुरु करण्याचा तसेच लांब पल्याच्या गाडयांना अधिक कोचेस जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
हा मूकमोर्चा भायखळ्यातील जिजामाता उद्यान येथून सकाळी ११ वाजता सुरू होऊन आझाद मैदान यथे संपणार आहे. या मोर्चामध्ये राज्यातून मोठ्या प्रमाणात मराठा सहभागी होणार असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील वाहतुकीत सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. मोर्चामध्ये सहभागी होणारे जिजामाता उद्यान येथे जमून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दक्षिण वाहिनीने जे. जे. उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे यू-टर्न घेऊन आझाद मैदान येथे पोहचणार आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी हा मार्ग मोकळा ठेवण्याची सुचना केली आहे. त्यानुसार या मार्गांवर बेस्टच्या बसगाड्या या काळात धावणार नाहीत.
तर रेल्वे प्रशासनाने मोर्चात सहभागी होऊन परतणाऱ्या लोकांसाठी दुपारी २ नंतर ७ गाडयांना जास्तीचा एक एक कोच लावले आहेत. मोर्च्यात सहभागी होणाऱ्या लोकसांठी अधिकच्या तिकीट खिडक्या सुरु करण्यात आल्या आहेत. तर रेल्वे प्रशासनांकडून सीएसटी येथे ३०, भायखळा येथे १२, मुलुंड येथे ६, कुर्ला येथे ६, वडाळा येथे ६, बेलापूर येथे ६ तर वाशी यथे ८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या मार्गांवरील बस सेवा बंद -
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जे. जे. उड्डाणपूल ज्या ठिकाणी सुरू होतो, त्याठिकाणापर्यंत दक्षिण वाहिनी (मुंबईच्या दिशेने) सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात आला आहे.
- जे. जे. उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जंक्शनपर्यंत दक्षिण आणि उत्तर वाहिन्या (येणारी-जाणारी) पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
- आझाद मैदान शेजारील ओ. सी. एस. जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शनपर्यंत जाणारा हजारीमल सोमानी मार्ग, मेट्रो जंक्शन ते मुंबई महानगर पालिका मार्ग आणि भाटिया बाग ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शनकडे येणारे उजवे वळण बंद करण्यात आले आहे.
- कर्नाक बंदर जंक्शनकडून कर्नाक ब्रिजकडे जाण्यासाठी वाहनांना प्रतिबंध आहे.
हे बस मार्ग वळवले -
- माटुंग्यातील किंग्ज सर्कल येथून डावे वळण घेऊन चार रस्त्याने पी. डीमेलो रोडकडे
- दादर टी. टी.पासून डावे वळण घेऊन चार रस्त्याकडे
- नायगाव क्रॉसरोड येथे डावे वळण घेऊन रफी अहमद किडवाई मार्गाकडे
- ग. द. आंबेकर मार्गे माने मास्तर चौक ते रफी अहमद किडवाई मार्गाकडे
- मादाम कामा रोडवरून हुतात्मा चौक येथे उजवे वळण घेऊन काळाघोडा मार्गे ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्गाकडे
- ना. म. जोशी मार्ग ते लोअर परळ रेल्वे स्थानक ते वरळी नाका मार्गे हाजी अली अलीकडे जाणारा मार्ग
- एन. एस. रोड (मरीन ड्राईव्ह) वरून पेडर रोड, हाजीअली मार्गे वांद्रे-वरळी सी लिंक किंवा इ मोजेस रोडवरून सिद्धिविनायक (प्रभादेवी) ते सेनाभवन मार्गे.