मुंबई / प्रतिनिधी -
राज्यभरातून अद्याप ५७ मराठा माेर्चा निघाले. अातापर्यंत निघालेल्या ५७ माेर्चामध्ये त्या त्या जिल्ह्यांमधून ५७ निवेदने राज्य सरकारला देण्यात अाली अाहेत. पण अातापर्यंत त्यासंदर्भात काेणतेही उत्तर सरकारने दिलेले नाही. त्यामुळे मुंबईत ९ अाॅगस्टला धडकत असलेला मराठा माेर्चा ही सरकारसाठी शेवटची संधी अाहेे. सरकारने अातापर्यंत दिलेल्या सर्व निवेदनांचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा मराठ्यांचा संयम सुटू शकताे अाणि त्यानंतर निर्माण हाेणाऱ्या परिस्थितीला मात्र सरकारच जबाबदार असेल असा इशारा मराठा क्रांती माेर्चाच्या महाराष्ट्र समन्वय समितीने दिला आहे.
मुंबईत ९ अाॅगस्टला हाेणाऱ्या मराठा क्रांती माेर्चाच्या तयारीचा अाढावा घेण्यासाठी महाराष्ट्र समन्वय समितीच्या प्रतिनिधींनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद अायाेजित केली हाेती. यावेळी बोलताना मुंबई हाेणाऱ्या या अभूतपूर्व माेर्चाची राज्यातच नव्हे तर देशात उत्सुकता निर्माण झाली असून न भूताे न भविष्यती असा हा माेर्चा असेल. परंतु हा मूकमाेर्चा शेवटचा असला तरी अांदाेलन यापुढेही कायम राहणार अाहे. महाराष्ट्र सरकारने अामचा अंत पाहू नये, त्याअगाेदर मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी मराठा माेर्चाच्या वतीने केली. या महामाेर्चानंतर महाराष्ट्र सरकारने जर अामच्या मागण्या मंजूर केल्या नाहीत, तर मराठ्यांचा संयम सुटू शकताे अाणि त्यानंतर निर्माण हाेणाऱ्या परिस्थितीला मात्र सरकारच जबाबदार असेल. त्यामुळे हा शेवटचा मूक माेर्चा अाहे असा समज सरकारने करून घेऊ नये. हा फक्त शेवटचा मूक माेर्चा अाहे पण यापुढेही अांदाेलन सुरूच राहिल, असा इशारा यावेळी देण्यात आला. अाम्ही मानाने येत अाहाेत. अाम्हाला मान द्यायचा अाहे की अपमान करायचा अाहे. हे शासनाने ठरवले पाहिजे असे मत यावेळी समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
मराठा मोर्चाला मुस्लिम संघटनांचा पाठिंबा -
९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे निघणाऱ्या मराठा मोर्चाला मुस्लीम संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. मोर्चामध्ये संघटनेचे १५ हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. राणीबाग ते आझाद मैदान दरम्यान मुस्लिम समाजाची लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहेत. या विभागातून मोर्चा निघणार असल्याने ठीक ठिकाणी बॅनर, होर्डिंग, कटआउट्स लावून मोर्चेकऱ्यांचे स्वागत केले जाणार आहे. मोर्चाच्या मार्गावर सहभागी लोकांना पाण्याचे पाऊच वाटण्यात येणार असल्याची माहिती "लाईफ इन लाईट" व "छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड" या संघटनेचे मोहम्मद शकील पटणी, बिना ठाकूर, अजित नरभवने यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुस्लिम समाजाला उच्च न्यायालयाने शिक्षणात आरक्षण दिले असले तरी सध्याचे राज्य सरकार आरक्षण देईल असे वाटत नसल्याने मराठा समाजाचीही आरक्षणाची मागणी असल्याने त्यांना पाठिंबा देत असल्याचे सांगण्यात आले.
मराठा क्रांती माेर्चासाठी मुंबई सज्ज -
मुंबईत नऊ अाॅगस्ट राेजी सकाळी ११ वाजता धडकणाऱ्या मराठा क्रांती माेर्चासाठी मुंबईचे कार्यकर्ते सज्ज झाले अाहे. माेर्चासाठी अावश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेण्यात अाल्या असून सहा हजार कार्यकर्ते हे माेर्चेकरांना दिशा दाखवण्याचे काम करतील. त्याचप्रमाणे मुंबईतील वाहतूक काेंडी टाळण्यासाठी मुंबई पाेर्ट ट्रस्ट, सिमेंट यार्ड, रे राेड येथे वाहनतळ उभारण्यात अाला असून एकाच वेळी २५ हजार वाहने येथे उभी राहू शकतील. वाहनांची संख्या वाढल्यास वडाळा ट्रक टर्मिनलचा पर्याय देखील उपलब्ध राहणार अाहे. माेर्चा संदर्भात सर्व माहती उपलब्ध करून देण्यासाठी तसेच माेर्चाच्या ठिकाणापर्यंत पाेहचण्यासाठी काेणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून ९३५०४११०११ हा मिसकाॅल्ड क्रमांक तयार करण्यात अाला असल्याची माहिती मुंबईच्या मराठा क्रांती माेर्चाच्या अायाेजकांनी दिली. पालिकेने शौचालय व पिण्याचे पाणीच नाही तर, वैद्यकीय सेवाही मोफत पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 110 डॉक्टरांचे पथक मोर्चे कर्यांची काळजी घेणार आहे.
या मार्गाने निघेल मोर्चा -
सकाळी ११ वाजता माेर्चा भायखळा येथील वीर जिजामाता उद्यान (राणीबाग) येथून सुरू हाेऊन ताे अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माइल मर्चंट चाैक, जे.जे. फ्लायअाेव्हर, ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अाझाद मैदानात पाेहचेल.
मोर्चाच्या मागण्या -
- मराठा समाजाला अारक्षण
- कोपर्डी हत्येतील दोषींवर कारवाई
- स्वामीनाथन अायाेगाची अमबलवाणी
- अाेबीसीना मिळणाऱ्या सुविधा मराठा समाजाला मिळाव्यात
- शेतकऱ्यांना सरकसकट कर्जमाफी