मुंबई / प्रतिनिधी -
देशाला दिव्यांगमुक्त करण्याच्या कामामध्ये रत्न निधि चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ वरळी यांचे कार्य खुप मोठे असून दिव्यांगासाठी माझे काही देणे लागते या भावनेने प्रत्येकाचा या अभियानात सहभाग महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.
रत्न निधि चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ वरळी यांच्या संयुक्त विद्यमाने ५० अपंगव्यक्तींना जयपूर फूटचे वितरण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात महापौर निवासस्थान, शिवाजी पार्क, दादर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर, स्टेट बॅक ऑफ इंडियाचे संचालक व्ही. रामलिंगम, रोटरीचे कल्याण बॅनर्जी, केवलभाई जैन, रत्नप्रभा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजीव मेहता, संदीप शहा हे मान्यवर उपस्थित होते.
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर पुढे म्हणाले की, रत्न निधि चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ वरळी यांचा स्तुत्य असा हा उपक्रम असून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱया या मंडळीना सर्वांनी पाठींबा द्यायला हवा, असेही महापौर म्हणाले. अपंग बांधवाना महापालिका रुग्णालयात अपंगाचे साहित्य तसेच सोयीसुविधा देण्यासाठी बजेटमध्ये योग्य ती तरतूद करु असे आश्वासनही महापौरांनी यावेळी दिले .