मुंबई / प्रतिनिधी -
भारतीय स्वातंत्र्याचा ७० व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील अर्जेंटिना दूतावासाने भारताचे राष्ट्रगीत असलेल्या ‘ जन गण मन’ वर ‘म्युरल’ ( भिंतीवरचे महाचित्र) भायखळाच्या जिजामाता उद्यान (राणीची बाग) येथील हम्बोल्ट पेंग्विन कक्षाच्या प्रवेशव्दारावरील भिंतीवर तयार केले असून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते या ‘म्युरल’ ( भिंतीवरचे महाचित्र) चे अनावरण पार पडले.
याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव सुमित मलिक, अर्जेंटिनाचे मुंबईतील वाणिज्यदूत अलेजान्ड्रो झोंथेनर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, अर्जेंटिनाची मुंबईतील उप वाणिज्यदूत आंद्रा गोन्झालेझ, प्रसिध्द म्युरल कलाकार पाबलो अर्नोल, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) सुधीर नाईक, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे संचालक (प्र.) डॉ. संजय त्रिपाठी तसेच संबंधित अधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, अर्जेंटिना देशाने ‘ जन गण मन’ वर ‘म्युरल’ (भिंतीवरचे महाचित्र) भायखळाच्या जिजामाता उद्यान (राणीची बाग) येथील हम्बोल्ट पेंग्विन कक्षाच्या प्रवेशव्दारावरील भिंतीवर तयार करुन बृहन्मुंबई महानगरपालिकेला भारतीय स्वातंत्र्याचा ७० व्या वर्धापनदिनाची चांगली भेट दिली आहे. हे ‘म्युरल’ तयार करणारे प्रसिध्द म्युरल कलाकार पाबलो अर्नोल यांचे मुंबईचा प्रथम नागरिक व महापौर म्हणून अभिनंदन करित असून दोन देशांमध्ये मैत्रींचे नवे पर्व यानिमित्ताने सुरु झाल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव सुमित मलिक यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, मुंबईतील अर्जेंटिना दूतावासाने मंत्रालयाची इमारत तसेच मरीन लाईन्स समुद्रकिनावरील भिंतीवर ‘म्युरल’ ( भिंतीवरचे महाचित्र) काढण्याची परवानगी मागितली होती, परंतु पावसाळयात याठिकाणी शक्य नसल्याने त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला विनंती केली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेने या विनंतीला मान देऊन राणीच्या बागेत भिंतीवर ‘म्युरल’ ( भिंतीवरचे महाचित्र) काढण्याची परवानगी दिल्याने आज हा चांगला क्षण अनुभवता आला असून याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेला त्यांनी धन्यवाद दिले.